मध्य मुंबईतील पूर्व-पश्चिम जोडणारा आणि नेहमीच वाहनांच्या गजबजाटात असलेला एल्फिन्स्टन पूल अखेर पाडण्यात येणार आहे. एल्फिन्सटन पुलावरील वाहतूक २५ एप्रिल रोजी ९ वाजल्यापासून पूर्णत: बंद केली जाणार आहे. हा पूल पाडून त्याजागी एमएमआरडीएच्या वतीने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. जो अटल सेतू (शिवडी) आणि वांद्रे वरळी सी लिंकशी जोडला जाणार आहे. या नव्या पूलामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून, याचा वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
वाहतूक उद्या म्हणजेच शुक्रवारपासून बंद करण्यात येणार आहे. याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात ८ एप्रिलला मुंबई पोलिसांनी अधिसूचना काढून वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. नागरिकांकडून आलेल्या हरकती तसेच हरकतीनुसार वाहतुकीच्या नियमात केलेले बदल जाहीर करत २५ एप्रिलला रात्री ९ वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पर्यायी मार्ग कोणते?
वाहतूक व्यवस्थापन पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांकरिता..
दादर पूर्व येथून दादर पश्चिम व दादर मार्केटकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा वापर
परेल पूर्व येथून प्रभादेवी व लोअर परळ येथे जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर (सकाळी ७ ते दुपारी ३).
परळ, भायखळा पूर्व येथून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व दिशेने जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा वापर
पश्चिमेकडून पूर्वकडे जाणाऱ्या वाहनांसाठी :
प्रभादेवी व लोअर परळ पश्चिम येथून परेल, टाटा रुग्णालय व के. ई. एम. रुग्णालय येथे जाण्यासाठी करी रोड पुलाचा वापर. (दुपारी ३ ते रात्री ११).
महादेव पालव मार्ग (करी रोड रेल्वे पूल) वाहतूक नियोजन.