Pik Vima Yojana: शेतकऱ्यांची थट्टा! विमा कंपन्यांकडून फक्त १९ रूपये नुकसान भरपाई
Saam TV April 24, 2025 10:45 PM
माधव सावरगावे, संभाजीनगर

विमा कंपनीकडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा थट्टा केल्याची घटना समोर आले आहे. संभाजीनगरमधील काही शेतकऱ्यांना थेट १९ रुपये नुकसान भरपाई दिल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप वाढलाय. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक रुपयांत पीक विमा योजना आणली आहे. पण विमा कंपन्यांनी पीक विम्याची नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केली आहे.

गतवर्षीच्या रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईपोटी विमा कंपनींकडून शेतकऱ्याच्या खात्यावर १९ रुपये १६ पैसे आणि २७ रुपये ९१ पैसे जमा करीत थट्टाच केल्याचे दिसून आले. शासनाने वर्ष २०२२ पासून १ रुपयांत पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार विमा कंपनीला देते. यामुळे पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अडीच पट वाढली आहे.

२०२३-२४ साठी गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील शेतकरी सचिन मगन सवई आणि त्यांचे बंधू सागर मगन सवई यांनी गव्हाची पेरणी केली होती. दोन्ही भावंडांनी पीक विमा उतरविला होता. डिसेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसाने गव्हाचे नुकसान झाले. या नुकसानीची सूचना त्यांनी दिली. प्रतिनिधींनी पंचनामे केले. दीड वर्षानंतर विमा कंपनीने भरपाई दिली. सचिन आणि सागर सवई यांच्या बँक खात्यात गट नंबर ६ मधील नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी २७ रुपये ९१ पैसे जमा केले. तर, गट नंबर ७ मधील २७ गुंठ्यांतील पीक नुकसानभरपाईसाठी १९ रुपये १६ पैसे अदा केले आहेत.

तर, त्यांच्या वडिलांना १० गुंठ्यातील गव्हाच्या पिकाची ७०० रुपये नुकसान भरपाई दिली. सचिन यांच्या नांदेडा येथील ८० गुंठे पिकाच्या नुकसानीपोटी ५७०३ रुपये दिले. वर्ष २०२३-२४ मधील पीक विमा नुकसान भरपाई देताना विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. रांजणगाव शेणपुंजी येथील सवई बंधूंना गहू पिकाच्या नुकसान भरपाईपोटी १९ रुपये १६ पैसे, २७ रुपये २१ पैसे दिल्याचे दिसून येते.याविषयी गंगापूर तालुका शेतकरी मित्र संघटना, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.