Pahalgam Attack : बुधच्या पर्यटकाचा मृतांत समावेश: जिल्ह्यातील सात पर्यटक सुखरूप; प्रशासनाची माहिती..
esakal April 24, 2025 01:45 PM

सातारा/ पुसेगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुध (ता. खटाव) येथील पर्यटक संतोष एकनाथ जगदाळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील सात पर्यटक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली.

पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये बुध (ता. खटाव) येथील संतोष एकनाथ जगदाळे यांचा समावेश आहे. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. सध्या त्यांचे वास्तव्य पुणे येथे होते. पिंपरी शाखेमध्ये एलआयसी एजंट म्हणून ते काम करत होते. दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या मृत्यू झाल्याने बुधसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हल्ल्यामुळे त्याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचे नातेवाईक काळजीत असून, त्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे.दरम्यान, जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील सात पर्यटक सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जम्मू-काश्मीर येथे जिल्ह्यातील काही जण पर्यटनासाठी गेल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची माहिती संकलित करत त्यांच्याशी संपर्क साधला. यामध्ये कऱ्हाड येथील माधवी मिलिंद कुलकर्णी, महेश मिलिंद कुलकर्णी, श्रीधर शामराव क्षीरसागर, वर्षा श्रीधर क्षीरसागर, सुखदा श्रीधर क्षीरसागर, तसेच सातारा येथील शरद हरिभाऊ पवार, विद्या शरद पवार यांचा समावेश आहे. ते सर्व जण सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

संपर्कासाठी हेल्पलाइन

सातारा : दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरच्या विविध भागांत जिल्ह्यातील पर्यटक अडकले असण्याची शक्यता आहे. या पर्यटक, तसेच त्यांच्या नातेवाइकांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने ०२१६२-२३२१७५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे (मोबाईल ९६५७५२११२२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. स्थानिक हेल्पलाइनसह मदतीसाठी पर्यटक, तसेच त्यांचे नातेवाईक श्रीनगर येथे दूरध्वनी क्रमांक : ०१९४-२४८३६५१, ०१९४- २४६३६५१, ०१९४- २४५७५४३, तसेच व्हॉट्सअॅप : ७००६०५८६२३, ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७ या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.