Nagpur: शालार्थ आयडी घोटाळ्यात विभागीय उपसंचालक नरड आणि नीलेश वाघमारे यांच्या संपर्कातील दोघांना पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री अटक केली. त्यांच्या माध्यमातून बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली.
सागर गणेशराव भगोले आणि भारत ढवळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सागर भगोले हा खासगी शाखेत लिपिक असून तो गेल्या काही वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर वेतन व भविष्य निर्वाह विभागात लिपिक म्हणून कार्यरत आहे.
याच ठिकाणी नीलेश वाघमारे हा अधीक्षक आहे. याशिवाय भारत ढवळे हा उपसंचालक कार्यालयात मुख्य लिपिक आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात यापूर्वी पोलिसांनी विभागीय उपसंचालक नरड आणि त्याच्या लिपिक सूरज नाईक याला अटक केली होती.
त्यानंतर पोलिसांनी आयपीचा अभ्यास करून त्या आधारावर तपास सुरू केला. उल्हास नरड यांच्या आयडीच्या आधारे अनेक शालार्थ आयडी काढण्यात आल्याची बाब समोर आली. त्यात सागर आणि भारत ढवळे सहभागी असल्याचे तपासात आढळून आले.
सागर हा काही वर्षांपूर्वी प्रतिनियुक्तीवर प्राथमिक विभागातील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकात आला होता. विशेष म्हणजे, या प्रकरणात शालार्थ आयडी तयार करण्याचे काम हे सागर करीत होता. त्यामुळे तो नरड यांच्याही संपर्कात आला.
त्याच्या माध्यमातून भारत ढवळे यानेही बनावट आयडी तयार करून देण्यात मदत केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, सूरज नाईक याला अटक केल्यावर भारत याच्याकडे त्या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी त्यांना सत्र न्यायालयात सादर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडीत रवानगी केली.
नातेवाईकांना लावले नोकरीवरसागर भगोले हा वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकात काम करीत असताना, त्याने आपल्या काही नातेवाईकांनाही नोकरीवर लावून दिल्याची माहिती आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रेही त्याने तयार करून दिल्याची माहिती आहे.