इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या ४२ व्या सामन्यात गुरुवारी (२४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी पराभूत केले. हा बंगळुरूचा यंदाच्या हंगामातील घरचे मैदान एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला विजय आहे. याआधी या हंगामात या मैदानात झालेल्या तिन्ही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
तसेच बंगळुरूचा हा ९ सामन्यांतील ६ वा विजय देखील ठरला. त्यामुळे त्यांचे आता १२गुण झाले असून त्यांनी पाँइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यांनी १० गुणांवर असलेल्या मुंबई इंडियन्स, पंजाब किंग् आणि लखनौ सुरर जायंट्सला मागे टाकले आहे.
बंगळुरूसह पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचेही १२ गुण आहेत, पण त्यांचा नेट रन रेट बंगळुरूपेक्षा चांगला आहे.
गुरुवारी झालेल्या सामन्यात बंगळुरूने राजस्थानसमोर २०६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला २० षटकात ९ बाद १९४ धावाच करता आल्या. बंगळुरूकडून जोश हेजलवूडची गोलंदाजी सर्वोत्तम ठरली. बंगळुरूसाठी तो विजयाचा हिरोही ठरला.
राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी यांनी सलामीला सुरुवात केली. जैस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्याच्यात आणि सूर्यवंशीमध्ये चांगली भागीदारी होत होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. पण ५ व्या षटकात सूर्यवंशीला भूवनेश्वर कुमारने बाद केले. सूर्यवंशीने १२ चेंडूत २ षटकारांसह १६ धावा केल्या.
तो बाद झाल्यांनंतर जैस्वाल नितीश राणासह डाव पुढे नेत होता. पण त्याला अर्धशतकासाठी एकाच धावेची गरज असताना जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर तो रोमरियो शेफर्डच्या हातून झेलबाद झाला. त्याने तुफानी फलंदाजी करताना ७ चौकार आणि ३ षटकारांसह १९ चेंडूत ४९ धावांची खेळी केली.
तरी राजस्थानचा कर्णधार रियान परागने नंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आक्रमक फटके खेळत संघाची धावगती आणखी वाढवली होती. मात्र त्याला फार काळ कृणाल पांड्याने टीकू दिले नाही.
कृणालने १० व्या षटकात पहिल्याच चेंडूवर रियानला माघारी धाडले. रियानचा झेल जितेश शर्माने घेत बाद केले. रियानने २ चौकार आणि २ षटकारांसह १० चेंडूत २२ धावा केल्या. नंतर नितीश राणाही १४ व्या षटकात बाद झाल्याने सामन्यात रोमांच आला होता. नितीशने २२ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या.
तरी नंतर ध्रुव जुरेलला शिमरॉन हेटमायर साथ देत होता. मात्र जोश हेजलवूडने गोलंदाजी केलेले १७ वे षटक महत्त्वपूर्ण ठरले. त्याने शिमरॉन हेटमायरला बाद करत ६ धावांच या षटकात दिल्या. हेमायरचा ११ धावांवर यष्टीरक्षक जितेश शर्माने झेल घेतला. मात्र नंतर १८ व्या षटकात मात्र ध्रुव जुरेल आणि शुभम दुबे यांनी २२ धावा चोपत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या.
१२ चेंडूत राजस्थानला विजयासाठी १८ धावांचीच गरज होती. मात्र १९ वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले होते. त्याने फक्त एक धावा देत सलग दोन चेंडूवर त्याने ध्रुव जुरेल आणि जोफ्रा आर्चर यांना बाद केले. जुरेलने ३४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावा केल्या. आर्चर शुन्यावर बाद झाला.
२० व्या षटकात १७ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर यश दयालने शुभम दुबेला बाद केले. दुबेने ७ चेंडूत १२ धावा केल्या. याच षटकात वनिंदू हसरंगाही १ धावेवर धावबाद झाला. शेवटी तुषार देशपांडे १ धावेवर आणि फझलहक फारुकी २ धावांवर नाबाद राहिला.
बंगळुरूकडून जोश हेजलवूडने शानदार गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेतल्या. तसेच कृणाल पांड्याने २ विकट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पु्र्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. बंगळुरूकडून विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी ९५ धावांची भागीदारी करताना अर्धशतकेही केली.
विराटने ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. पडिक्कलने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. तसेच फिल सॉल्टने २६, टीम डेव्हिडने २३ आणि जितेश शर्माने नाबाद २० धावांच्या छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या.
राजस्थानकडून गोलंदाजी करताना संदीप शर्माने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चर आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.