केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीच्या परीक्षेत यश मिळवायला अनेकजण वर्षानुवर्ष अभ्यास करतात, अनेकवेळा परीक्षेला बसतात. काहींना दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नांत यश मिळतं, तर काही शेवटच्या टप्प्यावर येऊन परीक्षा पास न झाल्याचंही अनेकदा ऐकण्यात येतं.
पण महाराष्ट्रातल्या दोन मुलांनी पहिल्याच प्रयत्नांत यूपीएससी परीक्षेत भरघोस यश मिळवलं आहे. तेही वयाच्या 21-22 व्या वर्षी.
पहिल्या प्रयत्नातच, तेही इतक्या लहान वयात असं यश मिळवणं ही फार दुर्मिळ गोष्ट मानली जाते.
स्वयंशिस्त, तयारी आणि समाजाशी जोडलेली जाण असेल, तर वय आणि वेळ हे फक्त आकडे राहतात हेच पुण्याचा शिवांश जागडे आणि नाशिकची श्रुती चव्हाण यांच्या यूपीएससीच्या निकालाकडे पाहताना दिसतं.
महाराष्ट्रात दुसरा येण्याचा मान पटकवणारा 22 वर्षांचा शिवांश शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ओळखला जात आहे. पुण्यातल्या वेल्हे तालुक्यातलं रूळे हे त्यांचं मूळगाव.
गावाकडे त्यांच्या वडिलांची थोडी शेती आहे. पण आई आणि वडील मिळून वडगावमध्ये टेलरिंगचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांचं कुटुंब तिथंच स्थायिक असल्याचं शिवांश जागडे बीबीसीशी बोलताना सांगत होता.
शिवांशचं कुटुंब दुसरी-तिसरीत असताना लहानपणीच वडगावला स्थायिक झालं. धायरीतल्या एका खासगी शाळेत त्याचं शिक्षण पूर्ण झालं.
वडगावमध्ये स्थलांतर झालं तरी त्याची गावाकडची नाळ तुटली नव्हती. त्याचं सणावाराच्या, शेतीकामाच्या निमित्तानं गावाकडं नेहमी येणं जाणं चालू असायचं.
भाताची लावणी करताना पोटरीभर चिखलात उतरण्याचा अनुभवही त्यानं घेतलाय. त्या ओल्या मातीचा वास अजूनही नाकात घुमतो, असं तो सांगतो.
नागरी सेवेचं बाळकडू"अकरावीसाठी औरंगाबादच्या सर्विसेस प्रिपरेटरी इन्सिट्यूशन या संस्थेत जाता आलं. अधिकारी होण्याचं बी माझ्यात तिथंच रुजलं," शिवांश सांगतो.
या संस्थेत बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीसह विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशप्रेम आणि नागरी सेवेची भावनाही रुजवली जाते. दरवर्षी या संस्थेत प्रवेशासाठीच्या परीक्षेला 10 हजार मुलं बसतात. त्यापैकी फक्त 7 जण निवडले जातात, असंही शिवांश पुढे सांगत होता.
तिथलं शिस्तीचं वातावरण पाहूनच अधिकारी बनायचं हे शिवांशनं पक्कं केलं. त्याची बारावी संपल्यानंतरच्या काळात कोविड-19 साथीरोगामुळे लॉकडाऊनची सुरुवात झाली होती.
याच काळात यूपीएससीच्या अभ्यासाला भरपूर मोकळा वेळही मिळाला. पुण्याच्याच फर्गुसन कॉलेजमध्ये त्यानं गणित या विषय घेऊन बीएससी पदवी शिक्षण सुरू केलं.
2023 मध्ये पदवी पूर्ण झाली आणि त्याच वर्षात त्यानं यूपीएससीसाठी तयारी अंतिम टप्प्यावर नेली.
यूपीएससी परीक्षेतही पर्यायी विषय गणित हाच निवडला. "गणितानं जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. कोडिंग, सोशल मीडिया, वैज्ञानिक तर्कशक्ती हे सगळं गणितातूनच समजून घेता आलं," असं तो सांगतो.
कोणताही क्लास लावला नाही"माझ्यासोबत माझे दोन-तीन मित्रही यूपीएससी परीक्षेची तयारी करत होते. युट्यूबवर, टेलिग्रामवर इतके व्हीडिओ आणि अभ्यासासाठी पुरेसं साहित्य उपलब्ध होतं की वेगळा क्लास लावण्याची गरज वाटली नाही,"
शिवांश यांनी स्वतःच अभ्यासाचं धोरण ठरवलं आणि कोणताही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात 26 वी रँक मिळवली.
"दररोज 14 ते 16 तास अभ्यास चालायचा. अनेकदा हे जमणार नाही, असंही वाटायचं. पण परीक्षेची तयारी करणारे सगळेचजण कधी न कधी या भावनेतून जात असतात हे माहीत होतं. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायचं," शिवांश सांगतात.
या सगळ्यात मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ते नियमित व्यायामाला जात होते. "सकाळचा एक दीड तास रोज जिममध्ये घालवायचो. त्यामुळे अभ्यासातून थोडा आराम मिळायचा," शिवांश सांगतात.
राज्यस्तरीय पातळीवर फुटबॉल खेळल्यानंही शारिरीक धडधाकटपणा त्यांच्यात आधीपासूनच होता.
समाजसेवेची गोडी आणि रॉबिनहुड आर्मी"लहानपणापासून मी आसपासच्या लोकांना कष्ट करताना पाहिलं आहे. कष्टाशिवाय काहीही मिळत नाही हे त्यातून समजत गेलं," ते सांगतात. त्यातूनच फक्त अभ्यासाची प्रेरणाच नाही तर कष्टकरी लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली.
"रॉबिनहुड आर्मी नावाच्या एका संस्थेशी मी जोडलो होतो. कुठे ताजं, चांगलं उरलेलं अन्न जमा करून ही संस्था भुकेल्या गरीब लोकांपर्यंत पोहोचवते."
"एकदा असंच कोणाच्या घरी उरलेलं अन्न गोळा करायला टीमसोबत गेलो होतो. घाईघाईत अन्न गोळा करायला लागणाऱ्या पिशव्या न्यायच्या राहिल्या. ज्यांच्याकडे अन्न आणण्यासाठी गेलो होतो त्यांच्याकडेही त्या उपलब्ध नव्हत्या."
म्हणून आसपासच्या दुकानांमध्ये पिशव्या शोधायला सुरूवात केली. दहा-बारा दुकानं फिरून झाली तरी कुणीच पिशवी देईना. पिशवीसाठी पैसे द्यायलाही ते तयार झाले होते.
"शेवटी, एका किराणा मालाच्या दुकानात गेलो. दुकानदारानं कशासाठी, काय म्हणून विचारपूस केली. आणि आम्ही करत असलेलं काम चांगलं आहे हे समजताच मोफत खूप पिशव्या दिल्या."
"आपलं काम आणि हेतू चांगला असेल तर लोक नेहमीच मदतीसाठी पुढे येतात हे त्यातून समजलं," शिवांश सांगतात.
रॉबिनहुड आर्मीकडूनच रविवारच्या दिवशी शिवांश वस्तीतील गरीब मुलांना शिकवायला जायचे. तिथं राहणं, पावसाचं पाणी घरात शिरणं, सांडपाण्यातून जगणं – हे प्रत्यक्ष अनुभवल्यावर ते म्हणतात, "त्यांच्याकडं पाहिल्यावर आपलं दुःख किती तोकडं आहे याची जाणीव होते. या मुलांत भरपूर प्रतिभा असते. शिकण्याची आसही असते. पण योग्य ती संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही."
"शिवांशने कष्ट घेतले हे आम्ही पाहिलं. शिक्षणात काहीही कमी पडू देणार नाही असं आम्ही ठरवलं होतं. आज त्याचा रिझल्ट आला आणि शब्दात सांगता येणार नाही असं समाधान मिळालं." शिवांशच्या आई अश्विनी जागडे सांगतात.
जिथेही पोस्टिंग मिळेल तिथं मनापासून काम करायचं असं शिवांश यांनी ठरवलं आहे. विशेषतः "कचरा व्यवस्थापन" हा प्रश्न त्यांना अतिशय महत्त्वाचा वाटतो.
समाजशास्त्राचं पाठबळनाशिकच्या 21 वर्षांच्या श्रुती चव्हाण यांनीही पहिल्याच प्रयत्नांत यूपीएससी परीक्षेत यश मिळवत 575 रँक मिळवली आहे.
चांदवडसारख्या ग्रामीण भागात त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. "आई वडिल दोघंही शिक्षक असल्यानं घरात शिस्तीचं वातावरण होतंच. पण कधीही अभ्यासाचा ताण नव्हता. मला हवं ते क्षेत्र निवडण्याची मोकळीक होती," श्रुती बीबीसी मराठीशी बोलताना सांगत होत्या.
"शाळेत एनटीएससी, एमटीएससीसारख्या परीक्षा दिल्या होत्या. त्यात यशही मिळालं होतं. त्यामुळे आपण स्पर्धा परीक्षेत चांगलं नाव काढू शकतो हे समजलं," त्या पुढे म्हणाल्या.
यूपीएससीच्या अभ्यासासाठी पुण्या-मुंबईला न जाता नाशिकमधल्याच एका कॉलेजात त्यांनी बीए करायचं ठरवलं. बीए समाजशास्त्र हाच विषय यूपीएससीसाठी घेतला. ऑनलाईन क्लास लावला आणि परीक्षेची तयारी सुरू केली.
"बीएचे विषय आणि यूपीएससी परीक्षेचे विषय बऱ्यापैकी सारखे असतात. त्यामुळे खूप मदत झाली. अभ्यासाची सुरूवात बीएच्या पहिल्या वर्षापासूनच केली होती.
पण शेवटचं एक वर्ष खूप मनापासून अभ्यास केला. सोबत कॉलेजही केलं," त्या सांगतात.
महिला शिक्षणावर काम करण्याची इच्छा2024 मध्ये त्यांचं पदवी शिक्षण पूर्ण झालं आणि लागलीच त्या यूपीएससीच्या परीक्षेला बसल्या.
"ग्रामीण भागातल्या मुलींसाठी शिक्षण घेणं फार अवघड आहे हे आसपास पाहताना समजतं. माझे आई वडील सोबत होते, घरातलं वातावरण सहकाऱ्याचं होतं त्यामुळे मला जमलं.
पण माझ्यासारख्या अनेक मुलींना शिक्षणापर्यंत पोहोचणं आजही कठीण आहे. त्यामुळे पुढे महिला आणि शिक्षण या क्षेत्रात काम करायचं आहे," त्या सांगतात.
यूपीएससीच्या मुलाखतीत विचारलेला एक प्रश्न त्यांना ठासून आठवतो. "महाराष्ट्रात वडिलांचं नाव लावलं जातं. पण आता त्यासोबत आईचंही नाव लावण्याचा नियम केला जात आहे. त्याबद्दल तुमचं मत काय असं मला विचारलं होतं."
ही किती अभिमानाची आणि महिला सक्षमीकरणासाठीची महत्त्वाची गोष्ट असल्याचंच श्रुती यांनी सांगितलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)