विजय सुराणा : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव दाभाडे, ता. २४ : कामशेत शहरातील मध्यवस्तीत शासकीय जमीन मोजणी करून अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. आता त्याला मुहूर्त मिळाला आहे. २९ एप्रिल रोजी भूमिअभिलेख विभागाच्या मदतीने ही कार्यवाही केली जाणार आहे.
कामशेत शहरात मध्यवस्तीत पार्किंग व्यवस्था नाही. त्यात शासकीय जागेवर अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. पंचक्रोशीत कामशेतची बाजारपेठ सर्वांत मोठी समजली जाते. परिसरातील उत्पादित शेतमाल येथील बाजारपेठेत येतो. प्रामुख्याने आंबेमोहर, इंद्रायणी तांदूळ खरेदीसाठी येथे अन्य शहरांतील ग्राहक मोठ्या प्रमाणावर येतात. लग्नसराईच्या काळात येथे मोठी गर्दी असते. मात्र दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि ग्राहकही त्रस्त झाले आहेत. याबाबतची सद्यस्थिती जाणून घेत ‘सकाळ’ने सहा मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध केले.
दरम्यान, यावर मध्यवस्तीतील शासकीय जमिनीची मोजणी करून अतिक्रमणे हटवण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी भूमिअभिलेख विभागाला धनादेश दिला होता. काही कारणांमुळे तो वटला नव्हता. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बांधकाम खात्याने भूमिअभिलेख विभागाच्या खात्यात रक्कम जमा केली आहे. त्यामुळे जमीन मोजणीची कार्यवाही वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या अर्जावरून कामशेत शहलातील शासकीय जागेची मोजणी २९ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
- के. बी. मादुले, सर्व्हेअर, भूमिअभिलेख
कामशेत शहरातील शासकीय जागेची मोजणी करून हद्दी निश्चित केल्या जातील. त्यानंतर शासकीय जागेवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
- धनंजय दराडे, उपअभियंता, सा. बां. विभाग
TDB25B02643