जसजशी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे तसतशी त्यामुळे होणाऱ्या आजारांची भीतीही वाढत चालली आहे. वाढत्या उष्णतेमध्ये लहान मुलांना अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. या वाढत्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यायला हवी. थोड्याशा निष्काळजीपणामुळे लहान मुले गंभीर आजारांना बळी पडू शकतात. हे आजार कोणते आहेत आणि त्यांची लक्षणे काय आहेत? या आजारांचा लहान मुलांवर काय परिणाम होतो? हे जाणून घेऊया आजच्या या लेखातून.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. या परिस्थितीत, लहान मुलांमध्ये तीन गंभीर आजारांचा धोका असतो. लहान मुलांना या आजारांपासून वाचवले पाहिजे. जर मुलांना हे आजार झाले तर त्याचा त्यांच्या आरोग्यावरच नव्हे तर त्यांच्या शरीराच्या अनेक भागांवरही वाईट परिणाम होऊ शकतो. हा परिणाम बराच काळ टिकू शकतो. उन्हाळ्यात लहान मुलांना होणारे गंभीर आजार म्हणजे डिहायड्रेशन, उष्माघात आणि अतिसार. लहान मुलांची या आजारांपासून काळजी घेतली पाहिजे.
उन्हाळ्यात लहान मुले अतिसाराला बळी पडतात. लहान मुलांमध्ये झालेल्या अतिसाराचा त्यांच्या पचनसंस्थेवर दीर्घकालीन परिणाम होतो. यासोबतच त्यांना डिहायड्रेशनचाही त्रास होऊ शकतो. डिहायड्रेशनमुळे मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे मुलांची वाढ देखील मंदावते. त्याचा त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. याशिवाय, लहान मुले उष्माघाताला बळी पडू शकतात. शरीराचे तापमान वाढल्यामुळे मुलांना उष्माघाताचा त्रास होतो. म्हणून, मुलांना या तीन गंभीर आजारांपासून वाचवले पाहिजे.
मुलांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. मुलांना जास्त वेळ उन्हात बाहेर नेऊ नका. यासोबतच त्यांच्या खाण्यापिण्याचीही काळजी घ्या. मुलांना सुती, हलके आणि कमी वजनाचे कपडे घाला. कलिंगड, टरबूज, द्राक्षे अशी फळे त्यांना खायला द्या. मुले बाहेर खेळायला जात असतील तर त्यांना टोपी घालूनच खेळायला पाठवा. त्यांच्यासोबत नेहमी पाण्याची बाटली आणि लिमलेटच्या गोळ्या असू द्याव्यात. जर मुले नुसते पाणी प्यायला कंटाळा करत असतील तर तुम्ही त्यांना फ्लेवर्स असणारे ग्लुकोज वॉटर देखील देऊ शकता. किंवा लिंबूपाणी हाही एक चांगला पर्याय असू शकतो.
हेही वाचा : Beauty Tips : स्किन टाईपनुसार निवडावे मेकअप प्रोडक्ट्स
संपादित – तनवी गुडे