पाकिस्तानमध्ये 1 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Marathi April 25, 2025 05:33 PM

पहलगम दहशतवादी हल्ला: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे बोलले जात आहे. हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. अशातच आता पाकिस्तानातून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानचा विकास दर कमी राहण्याची शक्यता वर्तवली असतानाच दुसरीकडे जागतिक बँकेने पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे 1 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. यासोबतच गरिबीची पातळीही झपाट्याने वाढणार असल्याची माहिती अहवालात दिली आहे.

पाकिस्तानातील वाढत्या गरिबीचा इशारा देण्यापूर्वी जागतिक बँकेने आपल्या अहवालात तेथील आर्थिक विकास दर 2.7 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. जागतिक बँकेने यासाठी पाकिस्तानातील कठोर आर्थिक धोरणांना जबाबदार धरले आहे.

संपूर्ण कृषी उत्पादनावर परिणाम होणार

जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, शाहबाज शरीफ यांचे सरकार वार्षिक वित्तीय तुटीचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहे आणि यामुळे जीडीपीच्या तुलनेत पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, जागतिक बँकेने म्हटले आहे की हवामानामुळे पाकिस्तानच्या संपूर्ण कृषी उत्पादनावर परिणाम होईल आणि तांदूळ, बाजरी यासारख्या प्रमुख पिकांवर वाईट परिणाम होईल. यामुळं पाकिस्तानमधील सुमारे 10 दशलक्ष लोक (बहुतेक ग्रामीण भागात) उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचतील.

पाकिस्तानमध्ये गरिबीचं प्रमाण वाढणार

अन्नटंचाई, गरिबी, बेरोजगारीमध्ये वाढ होणार असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. कृषी, उत्पादन आणि इतर कमी वेतनाच्या सेवांसारख्या प्रमुख क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल, ज्यामुळे दैनंदिन वेतन देखील वाढू शकणार नाही अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. जागतिक बँकेने पाकिस्तानसाठी आणखी एक चेतावणी दिली आहे, की चालू आर्थिक वर्षात त्यांच्या लोकसंख्येपैकी सुमारे 2 टक्के किंवा 19 लाख लोक दारिद्र्यरेषेखाली येतील. शिवाय, पाकिस्तानचे रोजगार-ते-लोकसंख्येचे प्रमाण 49.7 टक्के आहे, जे विशेषतः तरुण आणि महिलांमधील कमी श्रमिक बाजारातील सहभागाचे प्रमाण दर्शवते.

https://www.youtube.com/watch?v=vma9qsjzzfai

महत्वाच्या बातम्या:

खिशात नाही दाणा अन् बाजीराव म्हणा! 84 टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली, काय आहे पाकिस्तानचं खरं आर्थिक वास्तव

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.