Malaria Diet: मलेरिया झाल्यास आहार कसा असावा? सवकर बरं होण्यासाठी कोणत्या गोष्टी खाव्यात? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
esakal April 25, 2025 04:45 PM

world malaria day 2025 : सध्या देशाच्या अनेक भागांमधून मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. मलेरिया हा प्लास्मोडियम परजीवीमुळे होणारा डासांमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा परजीवी संक्रमित मादी अॅनोफिलीस डासाच्या चाव्याव्दारे मानवी शरीरात प्रवेश करतो. परजीवी प्रथम यकृतामध्ये वाढतात आणि नंतर रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि लाल रक्तपेशींना संक्रमित करतात.

मलेरिया झाल्यास त्याची लक्षण १०-१५ दिवसांनी दिसते. खुप ताप येणे, थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, अशक्तपणा आणि उलट्या यासाराखी लक्षणे दिसतात. अशावेळी मलेरियापासून लवकर बरे होण्यासाठी संतुलित आणि योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे.

आरोग्य तज्ञांच्या मते, योग्य आहार घेतल्यास शरीराची ऊर्जा वाढते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढून आजार दूर राहण्यास मदत मिळते. दरवर्षी जागतिक मलेरिया दिन २५ एप्रिल रोजी साजरा केला जातो. मलेरियाबद्दल लोकांना जागरूक करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. मलेरिया झाल्यास आहार कसा असावा हे जाणून घेऊया.

प्रथिनेयुक्त पदार्थ

मलेरिया संपूर्ण शरीराचा नाश करतो. मलेरिया दरम्यान स्नायू कमकुवत होण्याचे हेच कारण आहे. अशावेळी शरीराची प्रथिनांची गरज पूर्ण करणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही डाळी, उकडलेले अंडे, चीज, ताक किंवा दही कमी प्रमाणात खाऊ शकता. यामुळे शरीरातील खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती होते आणि ऊर्जा देखील टिकून राहते.

भरपूर पाणी

मलेरिया झाल्यास पाणी भरपुर प्यावे. मलेरियामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. ज्यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे वाढतात. अशावेळी तुम्ही भरपूर पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी, भाज्यांचे सूप आणि ग्लुकोजचे सेवन करू शकता. यामुळे शरीर हायड्रेटेड राहील आणि विषारी पदार्थ बाहेर पडतील, ज्यामुळे लवकर बरे होण्यास मदत होईल.

सहज पचणारे अन्न

मलेरियामध्ये पचनसंस्था कमकुवत होते. यामुळे जड आणि तळलेले पदार्थ खाऊ नका. तुम्ही आहारात खिचडी, दलिया, मूग डाळ सूप, उकडलेल्या भाज्या यासारख्या गोष्टी खाणे चांगले. यामुळे शरीराला पोषण मिळते आणि पोटावर जास्त दबाव येत नाही

फळे आणि भाज्यांचे सेवन

कोणत्याही आजारात फळ आणि भाज्यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे शरीरात जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर वाढण्यास मदत मिळते. मलेरिया झालेल्या रुग्णाला पपई, डाळिंब, किवी, सफरचंद, गाजर आणि पालक यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेली फळे आणि भाज्या खायला देणे खूप फायदेशीर आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतात.

पुढील पदार्थ खाणे टाळावे

तळलेले, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

थंड पदार्थ, बर्फ किंवा शीतपेय टाळावे.

कॅफिन आणि अल्कोहोल असलेले पेये टाळावे.

जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नका.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.