जुन्नर, ता. २५ : येथील नवीन बसस्थानकावरून विविध कारणांनी खंडित झालेल्या दीर्घ पल्ल्याच्या बससेवा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी शिवजन्मभूमी शिवनेरी (जुन्नर) प्रवासी महासंघाच्या वतीने नारायणगाव आगारप्रमुखांकडे करण्यात आली.
लांब पल्ल्यांच्या आणि थेट बससेवा नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. जुन्नर ते कोल्हापूर, तसेच धुळे, तुळजापूर, अक्कलकोट, नाशिक, रायगड, बीड या दीर्घ पल्ल्यांच्या बससेवा सुरू कराव्यात, तसेच अन्य मागण्यांबाबत आगर प्रमुखांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी नारायणगाव आगाराचे प्रमुख तुकाराम पवळे, विभाग नियंत्रक अरुण सिया, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष शैलेंद्र काजळे, सदस्य राकेश पांडव, किशोर खत्री आदी उपस्थित होते.
शैलेंद्र काजळे म्हणाले, ‘‘जुन्नरची वाढती लोकसंख्या आणि पर्यटन व अन्य कामांसाठी विविध शहरांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या तुलनेत प्रभावी आणि वारंवारता असलेली बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या लग्न व सुट्ट्या सुरू असून कौटुंबिक प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामध्ये महिला, मुले, ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. लांब पल्ल्याच्या थेट बससेवा नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे.’’
यावेळी विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सकारात्मक प्रतिसाद देत काही मार्गावर बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
नारायणगांव- जुन्नर फेऱ्या वाढवा
नारायणगांव ते जुन्नरसाठी सायंकाळी ६नंतर मिनी बसची सेवा बंद केली जाते. प्रवाशांच्या सोईसाठी सहानंतरची सेवा वाहकांसह सुरू करावी व ती रात्री १०पर्यंत असावी, अशी मागणी करण्यात आली.
चालक- वाहकांना असुविधा
दीर्घ पल्ल्याच्या काही चालक- वाहकांच्या म्हणण्यानुसार जुन्नर बसस्थानकात चालक- वाहकांच्या मुक्कामासाठी असुविधा आहे. एकाच अस्वच्छ लहान खोलीमध्ये चालक वाहकांना झोपावे लागते. येथील स्वच्छतागृहे अतिशय अस्वच्छ असून त्याठिकाणी दुर्गंधी असते. पाण्याची उपलब्धता नसते. अशा स्थितीमुळे अनेक चालक- वाहकांनी आगारप्रमुखांकडे तक्रारी केल्या.