Pahalgam Terror Attack : दहशतवादी आदिल हुसैन ठोकेर आणि आसिफ शेख यांची घरे सुरक्षा दलांनी केली नष्ट
esakal April 26, 2025 04:45 AM

श्रीनगर - पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर आणि ‘लष्करै तैयबा’चे दहशतवादी आदिल हुसैन ठोकेर आणि आसिफ शेख यांची घरे आज सुरक्षा दलांनी नष्ट केली. सुरक्षा दलांनी यासाठी एका दहशतवाद्याच्या घरामध्ये स्फोटके पुरली होती.

ठोकेर हा अनंतनाग जिल्ह्याचा रहिवासी असून तो पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार मानला जातो. आसिफ शेख हा पुलवामाचा रहिवासी असून तो देखील या हल्ल्यामध्ये सहभागी झाला होता. अन्य दोन दहशतवादी हे पाकिस्तानी असून त्यांना पकडण्यासाठी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

हाशीम मुसा ऊर्फ सुलेमान आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही पाकिस्तानच्या ‘लष्करे तैयबा’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून दक्षिण काश्मीरमध्ये आज विविध ठिकाणांवर छापे घालण्यात आले.

अवंतीपुरातील काही संशयित दहशतवाद्यांच्या घरांची झडती घेण्यात आली. सध्या सुरक्षा दले पहलगाम हल्ल्याचे स्थानिक धागेदोरे शोधून काढण्यात व्यग्र असून त्यासाठी विविध ठिकाणांवर छापे घातले जात आहे. एका स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की या हल्ल्याला स्थानिक पातळीवरून पाठबळ मिळाल्याचा संशय आहे.

पाकिस्तानच्या गोळीबाराला प्रत्युत्तर

जम्मू- काश्मीरच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैनिकांनी गुरुवारी रात्री भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी देखील त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. सुदैवाने या चकमकीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवरील तणाव वाढला असून दोन्ही बाजूंनी गस्त वाढविण्यात आली आहे.

जगभरातील देशांचा भारताला पाठिंबा

नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज इस्राईल, अर्जेंटिना, इजिप्त आणि नेपाळच्या राजदूतांनी तसेच अनेक देशांच्या मुत्सद्यांनी परराष्ट्रमंत्री ए.जयशंकर यांची भेट घेऊन भारताला पाठिंबा दर्शविला.

साऊथ ब्लॉकमधील परराष्ट्र मंत्रालयात अमेरिका, युरोपीय महासंघ, इटली, कतार, रशिया, चीन, जपान आणि फ्रान्ससह अनेक देशांच्या मुत्सद्यांची वर्दळ होती. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पहलगाम हल्ल्याविषयी जर्मनी, पोलंड, जपान, ब्रिटन, रशिया तसेच चीन आणि कॅनडासह जी-२० देशांच्या मुत्सद्यांशी चर्चा केली आहे.

दहशतवाद्यांचा शोध सुरूच

जम्मू - पहलगामसह बारामुल्ला येथे मध्ये हल्ला केलेल्या तीन दहशतवाद्यांचा शोध आजही सुरू होता. जवानांनी आज उधमपूर जिल्ह्यात नाकाबंदी करत शोधमोहीम राबविली. याच जिल्ह्यात दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता गुप्तचरांनी वर्तविली आहे. तसेच, किश्तवाड, कथुआ, राजौरी आणि पूँचमध्येही बंदोबस्त वाढविण्यात आला असून येथेही दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. शोध घेण्यासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.

दहशतवादाचा जगाला धोका - धनकड

उटी : दहशतवाद ही जागतिक समस्या असल्याचे पहलगाममधील हल्ल्याने सिद्ध झाले आहे, असे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी आज येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. राष्ट्रीय हिताच्या प्रश्नी सर्वांनी राजकीय आणि वैयक्तिक हित बाजूला ठेवायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘भारत हा जगातील शांतताप्रेमी देश आहे. वसुधैव कुटुंबकम ही आमची संस्कृती आहे,’ असे धनकड म्हणाले.

पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप

आसनसोल - पश्चिम बंगालमध्ये आसनसोल येथे सुधारित वक्फ कायद्याविरोधात निघालेल्या मोर्चामध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध करत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर टीका केली आहे. ‘ममता बॅनर्जी यांनी बंगालला इस्लामिक खिलाफत बनविले आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.

ठळक घडामोडी

  • लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी काश्मीरमध्ये, परिस्थितीची आढावा.

  • चारधाम यात्रेसाठी नोंदणी केलेल्या पाकिस्तानमधील ७७ जणांचा व्हिसा रद्द

  • दारुल उलून देवबंदकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त

  • हल्लेखोरांना शोधून शिक्षा करा : मानवाधिकार आयोगाची मागणी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.