रायपूर : काश्मीरचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटनासाठी गेलेल्या छत्तीसगडच्या अकरा जणांचा गट पहलगामच्या हल्ल्याच्या टप्प्यात होता, मात्र एका टुरिस्ट गाइडने प्राणाची बाजी लावत या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी नेले आणि मोठे संकट टाळले.
नजाकत अहमद शाह (वय २८) असे टूरिस्ट गाइडचे नाव असून तो छत्तीसगडच्या मनेंद्रगड, चिरमिरी आणि भरतपूर जिल्ह्यातील अकरा जणांच्या पर्यटकाच्या गटाला मार्गदर्शन करत होता. यात चार जोडपी आणि तीन लहान मुले होती.
पहलगामच्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झालेला असताना त्यात नजाकत शाह यांच्या भावाचा देखील समावेश होता. छत्तीसगडचे अरविंद अग्रवाल यांनी सोशल मीडियावर शाह यांच्यासमवेत काश्मीर भेटीच्या वेळी काढलेला एक फोटो शेअर कृतज्ञता व्यक्त केली. अग्रवाल हे भाजयुमोचे सदस्य असल्याचा फेसबुक प्रोफाइलमध्ये उल्लेख आहे. त्यांच्यासमवेत कुलदीप स्थापक, शिवांश जैन आणि हॅपी वधावन कुटुंबीय देखील सोबत होते.
फोनवरून ‘पीटीआय’शी बोलताना शाह म्हणाले, छत्तीसगडचे कुटुंबीय दोन वाहनांतून १७ एप्रिलला जम्मूला पोचले. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग पाहून आम्ही शेवटी पहलगामला पोचलो. त्यादिवशी बैसरनची सैर केली. तेथून निघण्याची तयारी करत असतानाच गोळ्यांचा आवाज आला. हजारो पर्यटक सैरावैरा पळत होते.
माझं पहिलं लक्ष पर्यटक कुटुंबांकडे गेलं. मी कुलदीप यांचे मूल आणि अजून एक मुलं घेऊन खाली झोपलो. मी या मुलांना घेऊन अरुंद पण मोकळ्या जागेतून बाहेर गेलो आणि पहलगाम शहराच्या दिशेने पळालो. त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर पुन्हा घटनास्थळी आलो आणि उर्वरित पर्यटकांनाही सुरक्षितरित्या बाहेर काढले. मी ईश्वराचे आभार मानतो की मी माझे ११ पाहुणे सुरक्षितपणे बाहेर काढले.
पर्यटकांच्या सुरक्षेस प्राधान्यपहलगाम हल्ल्यात त्यांच्या मामाचा मुलगा आदिल हुसेन मृत्युमुखी पडला. पण शहा यांनी पर्यटकांना परत नेण्याचं ठरवलं व ते अंत्यसंस्कारास उपस्थित राहू शकले नाहीत. शाह म्हणतात, मी वडिलांसोबत चिरमिरीला जात असे आणि तिथेच कुलदीपशी ओळख झाली. मला पाहुण्यांचे प्राण वाचवायचे होते, मग जीव गेला तरी बेहत्तर. कुलदीप स्थापक यांनीही कुटुंबासोबत शाह यांच्यासोबतचे फोटो शेअर करून त्यांचे आभार मानले.