Ambasan News : मोराणे सांडस येथे नुकसानग्रस्तांना मदत
esakal April 26, 2025 08:45 PM

अंबासन- मोराणे सांडस (ता. बागलाण) येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीमध्ये बुधवारी (ता. २३ ) गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. या आगीत दहा घरे पूर्णपणे भस्मसात झाली असून आदिवासी बांधवांचा संसार उघड्यावर पडला आहे. या दुर्घटनेत सुमारे सात ते आठ शेळ्याही होरपळून मृत्युमुखी पडल्या. दुसऱ्या दिवशीसुद्धा या परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळत होते, यावरून आगीची तीव्रता किती भयानक होती हे स्पष्ट होते.

घटनेची माहिती मिळताच आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने १ लाख ४० हजार रुपयांची आर्थिक मदत नुकसानग्रस्त कुटुंबांना दिली. याशिवाय त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून त्वरित सरकारी मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले.

तलाठी जयप्रकाश सोनवणे यांनी या दुर्घटनेचा प्राथमिक पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला आहे. या संकटाच्या वेळी गावातील सुज्ञ नागरिकांनी मदतीचा ओघ सुरू केला आहे. काहींनी संसारोपयोगी भांडी, कपडे, अन्नधान्य देऊन मदतीचा हात दिला तसेच नामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते परेश सावंत यांनी या कुटुंबांसाठी लोखंडी कोठे (स्टोरेज बॉक्स) दिले, जेणेकरून उपलब्ध साहित्य सुरक्षित ठेवता येईल. दरम्यान, स्थानिक गावकऱ्यांसोबतच बाहेरगावाहूनही अनेकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. गावात सामाजिक ऐक्य आणि आपत्तीसमयी एकत्र उभे राहण्याचा एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.