नाशिक- पाथर्डी फाटा येथील पेरूची बाग परिसरात बेकायदेशीरपणे जुगाराचा अड्डा चालविणारा सराईत गुन्हेगार समीर ऊर्फ छोटा पठाण याची महागडी १५ लाखांची कार पोलिसांवरील दगडफेकीच्या दाखल गुन्ह्यात जप्त करण्यात आली. त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला.
समीर नासीर पठाण (३४, रा. स्काय अपार्टमेंट, मदिनानगर, वडाळा गाव) याला गुन्हेशाखेने दंगलीच्या गुन्ह्यात अटक केली. गेल्या १५ तारखेला पखाल रोडवरील उस्मानिया चौकात घडलेल्या अनधिकृत धार्मिकस्थळ निष्कासित करण्याच्या कारवाईपूर्वी आक्रमक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती.
यात संशयित पठाण सहभागी होता, असे तपासात समोर आले आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ताब्यात असून, त्याने दगडफेकीसह जमावात सहभागी होण्यासाठी वापरलेली पंधरा लाखांची कार (एमएच १२ यूसी ४५५५) जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला असून, त्यातील माहिती घेतली जात आहे.