चेन्नई सुपर किंग्सची घरच्या मैदानावरील पराभवाची मालिका कायम आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच हा संघ घरच्या मैदानवार सलग चार सामने हरला आहे. दिल्ली कॅपिटल्सने १५ वर्षानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७ वर्षानंतर तर सनरायझर्स हैदराबादने प्रथमच CSK ला चेपॉकवर पराभूत करण्याचा पराक्रम इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये केला. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याने चेन्नईच्या कामगिरीवर जोरदार टीका केली. CSK च्या फलंदाजांमध्ये धावांची भूक दिसलीच नाही आणि त्यांनी जिंकण्याचे प्रयत्नच केले नाही. असे सांगून वीरूने CSK च्या अनुभवी फलंदाजाचे वाभाडे काढले.
चेन्नई सुपर किंग्स ९ सामन्यांत सात पराभवामुळे गुणतालिकेत तळावर आहे आणि उर्वरित पाच सामने जिंकूनही प्ले ऑफमध्ये ते प्रवेश करतील, याची खात्री नाही. क्रिकबजच्या कार्यक्रमात वीरूने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तो म्हणाला, मला स्वतःला ही स्पर्धा मध्येच सोडून घरी जाऊ, असे वाटत आहे. चेन्नई सुपर किंग्सचे फलंदाजही असाच विचार करत आहेत. त्यांना घरी जाण्याची घाई झाली आहे.
'ही स्पर्धा कधी एकदाची संपतेय? किमान CSK च्या संघातील एकाने तरी जबाबदारी घ्यावी. जडेजाचा स्ट्राईक रेट किती टुकार आहे ते पाहा. किमान त्याने १५ किंवा १८व्या षटकापर्यंत मैदानावर उभं राहण्याचा प्रयत्न तरी करायरला हवा होता,' असे वीरू म्हणाला. जडेजाने ९ सामन्यांत १६६ धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट हा १२५.७६ इतका आहे. आयपीएलच्या संपूर्ण कारकिर्दीतील त्याचा स्ट्राईक रेट १२९.५६ इतका आहे, त्यापेक्षा खराब कामगिरी त्याने यंदा केली आहे.
चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या फलंदाजीच्या क्रमात बदल केलेले पाहायला मिळाले. रचिन रविंद्रला काल प्लेइंग इलेव्हनमधून वगळले गेले. आयुष म्हात्रेला सलामीला संधी दिल्यामुळे चेन्नईचा तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न तसाच आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सॅम कुरन तिसऱ्या क्रमांकावर आला. 'सॅम कुरन तिसऱ्या क्रमांकावर काय करतोय, हेट मला समजले नाही. त्याने वरच्या क्रमांकावर खेळावे, हे नक्की. ILT20 मध्ये तो चौथ्या क्रमांकावर खेळला होता आणि त्याने ती भूमिका चोख बजावली होती. चेन्नईच्या लाईनअपचा विचार केल्यास डेवॉल्ड ब्रेव्हिस तिसऱ्या क्रमांकावर असायला हवा होता,'असे वीरू म्हणाला.
'त्यानंतर दुबे, जडेजा, कुरन व दीपक हुडा असा क्रम असायला हवा. ऋतुराज गायकवाडची उणीव जाणवतेय,'असेही वीरू म्हणाला.