दिघीकरांचा मार्ग अजूनही खडतरच
esakal April 26, 2025 10:45 PM

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. २६ ः दिघीकरांच्या रस्त्याचा प्रश्न सुटला असला तरी भोसरीतील दिघी रस्ता खाचखळग्यांनी भरलेला असल्याने दिघीकरांचा प्रवास खडतर झाला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्क ते सावंतनगरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्थाच आहे. त्यामुळे दिघी आणि भोसरी ग्रामस्थांद्वारे संताप व्यक्त होत आहे.
भोसरीवरून दिघीला जाण्यासाठी पूर्वी दिघी रस्ता हाच एकमेव जवळचा मार्ग होता. मात्र, हा रस्ता मूळ मालकांद्वारे या-ना त्या कारणांनी वारंवार बंद करण्यात येत होता. त्यामुळे दिघी ग्रामस्थांना भोसरी आणि शहर परिसरात येण्यासाठी साडेतीन किलोमीटर अंतराच्या मॅगझीन चौकातून आळंदी रस्त्याचा उपयोग करावा लागत होता. त्यामुळे कामगार, विद्यार्थी आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून भोसरीतील दिघी रस्ता आणि दिघीतील भारतमातानगरमधून गायरानातून आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता स्थानिक मूळ जागा मालकांच्या समन्वयाने सुरू केला. त्याचप्रमाणे संत निरंकारी भवनासमोरून लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) सिमाभिंतीजवळून जाणाऱ्या रस्त्याचे कामही प्रगतिपथावर आहे. त्यामुळे दिघीकरांची रस्त्याची समस्या सध्या तरी सुटली आहे. मात्र, असे असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे भोसरीतील दिघी रस्त्याच्या गंगोत्री पार्क ते सावंतनगरपर्यंतच्या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. गंगोत्री पार्कमधील सीएमई सीमाभिंत ते बसील पार्कपर्यंतचा रस्ता तर गेल्या पंधरा वर्षांपासून खड्डेमयच आहे. या रस्त्यावर वारंवार सांडपाणी वाहिनी नादुरुस्त होते. त्यामुळे चेंबरच्या दुरुस्तीसाठी, जलवाहिनी टाकण्यासाठी तर कधी विद्युत केबल टाकण्यासाठी हा रस्ता वारंवार खोदला जाऊन त्यानंतर मात्र त्याच्या डांबरीकरणाचा विसर महापालिकेला पडल्याने हा रस्ता नेहमीच खाचखळग्यांनी भरलेला दिसून येतो.
सावंतनगरजवळील चौक आणि रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री कॉलनी क्रमांक तीन समोरून जाणाऱ्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. मात्र, या खड्ड्यांच्या डांबरीकरणाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने खड्डेमय रस्त्यातून वाहन चालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.

उन्हाळ्यात धूळ, पावसाळ्यात वाहन कोंडीचा सामना
सीएमई सीमाभिंत ते बसील पार्कपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने वाहनांमुळे धुळीचे लोट उडून नागरिकांना घशाच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यात वाहने अडकून पडल्याने येथील नागरिकांना नेहमीच वाहनांच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. गेल्या पावसाळ्यात येथील खड्ड्यात वाहने अडकून काही वाहनांचे नुकसानही झाले आहे.

दिघी रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठीच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. मात्र पावसाळा सुरू होणार असल्याने या रस्त्याच्या कामाला ऑक्टोबर महिन्यात सुरूवात होण्याचा अंदाज आहे.
- बालाजी पांचाळ, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग, ई क्षेत्रीय कार्यालय

भोसरीतील सीएमई सिमाभिंतीजवळून जाणारा नियोजित आराखड्याप्रमाणे भोसरी-दिघी शिवरस्ता होणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्यामध्ये काहींनी इमारत बांधल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. हा रस्ता झाल्यास दिघी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होण्याची शक्यता आहे.
- संजय गायकवाड, स्थानिक नागरिक, दिघी

मुळातच गंगोत्री पार्कमधला रस्ता अरुंद आहे. या रस्त्याचा वापर दिघी, बोपखेल, विश्रांतवाडीतील नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून हा रस्ता नादुरुस्त अवस्थेतच राहिलेला दिसून येतो. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. महापालिकेने या रस्त्याला पर्यायी रस्ता उभारणे गरजेचे आहे.
- संदीप सोनवणे, स्थानिक नागरिक, दिघी


रुग्णवाहिका अडकली वाहनांच्या कोंडीत
शुक्रवारी (ता. २५) दुपारी एकच्या सुमारास दिघीवरून भोसरीकडे जाणारी रुग्णवाहिका गंगोत्री पार्कमधील रस्त्यावर झालेल्या वाहनांच्या कोंडीत अडकली. दहा मिनिटांनंतर या रुग्णवाहिकेस पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध झाला.

पावसाळ्यात साचते तळे
गंगोत्री पार्कमधील संत निरंकारी भवन ते सीएमई सिमाभिंतीपर्यंतच्या रस्त्यावर उतार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी उतारावरून सीएमई सिमाभींतीजवळ येऊन थांबते. मात्र येथे पाण्याचा निचरा जलद होत नसल्याने या ठिकाणी पाण्याचे तळे तयार होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथे पाण्याचा निचरा होण्यासाठीची उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.