Pahalgam Terror Attack : पर्यटकांचा जीव वाचविणारा 'पहलगामचा नायक'; बैसरनमधून भयभीत, जखमींना काढले बाहेर
esakal April 27, 2025 05:45 AM

पहलगाम - ‘तेथे दहशतवादी असले तरी पर्वा नाही असा विचार करत मी बैसरन व्हॅलीकडे धाव घेतली आणि तेथे भयभीत झालेले आणि जखमी पर्यटकांना शक्य तेवढी मदत केली,’ असे रईस अहमद भट सांगत होते.

दहशतवादी हल्ल्यात पाच पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या रईस अहमद भट यांचा ‘पहलगामचा हिरो’ म्हणून गौरविले जात आहे. ते घोडेमालक संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सहकाऱ्यांच्या मदतीने जखमी पर्यटकांना मदत केली.

भट यांनी सांगितले की, २२ एप्रिलच्या दुपारी २.३५ वाजता युनियनच्या जनरल अध्यक्षांकडून हल्ला झाल्याचे समजले. मी घटनास्थळी असलेल्या लोकांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण नेटवर्कच्या अडचणीमुळे फोन लागला नाही. शेवटी मी कोणताही विचार न करता तातडीने कार्यालयातून निघालो आणि काही स्थानिकांना सोबत घेऊन बैसरन व्हॅलीत पोचलो.

तेथील दृश्य विदारक, धक्कादायक होते. तेथे चिखलाने माखलेले, पाण्यासाठी ओरडणारे पर्यटक पाहून हादरलो. मात्र जखमी पर्यटकांना मदत केली आणि त्यांना पाणी देऊन सुरक्षितस्थळी पाठवले.’

ते पुढे म्हणाले की, अनेक घोडेमालक घाबरून पळून जात होते, पण त्यांनी त्यांना परत आणले. मुख्य प्रवेशद्वाराजवळच पहिला मृतदेह पाहून धक्काच बसला. मी ३५ वर्षांचा आहे आणि पहलगाममध्ये कधीच अशी घटना घडलेली पाहिली नव्हती. आत सर्वत्र मृतदेह पडलेले दिसले. तीन-चार महिला त्यांच्या पतींना वाचवण्याची विनवणी करत होत्या.

हे भयावह चित्र पाहून काय करावे, हेच कळत नव्हते. तरी मन घट्ट करून आम्ही आत गेलो. घटनास्थळी भट यांच्यासोबत युनियनचे जनरल अध्यक्ष अब्दुल वहीद आणि शाल विक्रेते सज्जाद अहमद भटही होते. या सर्वांनी शक्य तेवढ्या वेगाने पर्यटकांना तेथून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि जखमींना दवाखान्यात नेण्यास मदत केली.

सज्जाद यांचा एका मुलाला खांद्यावर उचलून नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भट म्हणाले, बैसरनच्या व्हॅलीत पर्यटकांची गर्दी असते, मात्र सध्या भूस्खलनाचे प्रकार घडल्याने आणि रस्ते बंद असल्यामुळे त्या दिवशी गर्दी कमी होती. त्या ठिकाणी वाहनाचा रस्ता नाही. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांना पायीच यावे लागले.’

काठमांडूत पाकिस्तान दूतावासाबाहेर आंदोलन

काठमांडू - पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी काठमांडूतील पाकिस्तान दूतावासाबाहेर निदर्शने करण्यात आले. भारतीय समुदाय आणि प्रवासी भारतीयांनी भारतीय ध्वज, फलक आणि पोस्टर्स घेऊन दहशतवादाचा तीव्र निषेध केला आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

यावेळी आंदोलकांनी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी केली तसेच दहशतवादाला मदत आणि आश्रय देत असल्याचा आरोप केला. तत्पूर्वी लंडनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरही भारतीय समुदायाने निषेध नोंदवला होता.

दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त

कुपवाडा - पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यात धडक कारवाई केली जात असून संशयित ठिकाणी छापे घातले जात आहेत. एसओजी आणि लष्कराच्या बाराव्या तुकडीने संयुक्त मोहीम राबवत माछिलच्या सेदोरी नागला भागातील दहशतवाद्यांचे ठिकाण उद्ध्वस्त केले.

घटनास्थळावरून पाच एके-४७ रायफल्स, आठ एके-४७ मॅगझिन्स, एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, ६६० काडतूस यासह शस्त्रसाठा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. या कामगिरीमुळे संभाव्य दहशतवादी कारवाया रोखण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.