Mohan Bhagwat : ''दुष्टतेचा मार्ग अवलंबणाऱ्यांना प्रत्युत्तर देणं राजाचं कर्तव्य'', पहलगाम हल्ल्यानंतर मोहन भागवतांचं महत्त्वाचं विधान, नेमकं काय म्हणाले?
esakal April 27, 2025 02:45 PM

Pahalgam terror attack Mohan Bhagwat reaction : पहलागम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानला कायमस्वरुपी धडा शिकवावा, अशी मागणी विविध स्तरातून होऊ लागली आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही यासंदर्भात पुन्हा एकदा प्रतिक्रिया देत महत्त्वाचं विधान केलं आहे.

मोहन भागवत यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना यासंदर्भात भाष्य केलं. ''भारताने कधीही शेजारी देशांचा अपमान केला नाही किंवा त्यांचं काही नुकसान होईल, असं कृत्यं केलं नाही. मात्र, जर कोणी दुष्टतेचा मार्ग अवलंबणार असेल तर तर त्याला प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही'', असं ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?

“आम्ही कधीही शेजाऱ्यांचा अपमान केला नाही. किंवा त्यांचं काही नुकसान केलं नाही. पण जर कोणी दुष्टतेचा मार्ग स्वीकारणार असेल तर दुसरा पर्याय काय? प्रजेचे रक्षण करणं आणि दृष्ट प्रवृत्तींना धडा शिकवणं हे प्रत्येक राजाचे कर्तव्य आहे. त्याने आपले कर्तव्य पार पाडलेच पाहिजे.” अशी प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी दिली.

''दहशतवाद्यांना धडा शिकवणं आवश्यक''

पुढे बोलताना, हिंदू धर्मात अहिंसा हे मूळ तत्त्व असले तरी आक्रमकांचा सामना करणे आणि त्यांना पराभूत करणं हादेखील धर्माचाच भाग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ''अहिंसा हा भारताचा धर्म आहे, भारतीय मूल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. पण दहशतवादी, अत्याचारी, गुंड लोकांना धडा शिकवणंही आवश्यक आहे'', असं ते म्हणाले.

यापूर्वी व्यक्त केला होता निषेध

दरम्यान, यापूर्वीही पहलगाम हल्ल्यासंदर्भात मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली होती. या हल्ल्यानंतर त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. “ही लढाई पंथ किंवा धर्माची नसून धर्म आणि अधर्मातील आहे. आपण असे लोक आहोत, जे प्रत्येकामध्ये चांगले पाहतो आणि ते स्वीकारतो. आज आपल्याकडे लष्कर आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा आपल्याला सैन्याची गरज वाटली नाही. युद्ध होणार नाही म्हणून आपण निश्चिंत राहिलो आणि मग १९६२ साली आपल्याला धडा मिळाला. तेव्हापासून आपण आपल्या लष्कराची ताकद वाढवत आलो आहोत. दृष्टांचा नाश झालाच पाहिजे. आज याबद्दल देशात संताप तर आहेच पण मोठ्या अपेक्षाही आहेत. या अपेक्षा पूर्ण होतील, अशी आशा करूयात.” असं त्यांनी म्हटलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.