Gujarat : गुजरातेत बेकायदा बांगलादेशींना पकडले; पोलिसांची धडक कारवाई; नेमकी कशी केली घुसखोरी..?
esakal April 27, 2025 02:45 PM

अहमदाबाद (पीटीआय) : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना परत पाठविण्याची जोरात तयारी सुरू असताना दुसरीकडे गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरतमध्ये छापासत्रात एक हजाराहून अधिक बेकायदा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी सांगितले.

अहमदाबादमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या किमान ८९० आणि सुरतमध्ये १३४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. गुजरात पोलिसांनी आजपर्यतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले. संघवी यांनी बेकायदा स्थलांतरितांना स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. अन्यथा देशाबाहेर पाठवले जाईल, असा त्यांनी इशारा दिला. तसेच, बेकायदा स्थलांतरितांना आश्रय देणाऱ्या लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा त्यांनी दिला.

संघवी यांनी सुरतमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतल्यानंतर पत्रकारांना कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनी पश्चिम बंगालमधून बनावट कागदपत्रे मिळवून भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये वास्तव्य केले आणि नंतर ते गुजरातमध्ये आले. यापैकी बरेच लोक अमलीपदार्थ तस्करी, मानवी तस्करी अशा कारवायांमध्ये आहेत.

अलीकडे अटक करण्यात आलेल्या चार बांगलादेशींपैकी दोन नागरिक अल कैदाच्या स्लीपर सेलमध्ये काम करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी केली जाणार आहे. ताब्यात घेतलेल्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतात व गुजरातमध्ये कसे प्रवेश केला, याचीही चौकशी केली जाईल आणि बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल," असेही त्यांनी सांगितले. संघवी म्हणाले की, संपूर्ण गुजरातमध्ये बेकायदा स्थलांतरितांविरुद्ध कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत तसेच सुरक्षा समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानच्या नागरिकांनाही गुजरात सोडण्याचे आदेश देण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.