नोएडा (उत्तरप्रदेश) - ‘आधी मी पाकिस्तानची मुलगी होते, आता मात्र भारताची सून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना माझी विनंती आहे की त्यांनी मला भारतामध्येच राहण्याची परवानगी द्यावी.’’ हे उद्गार आहेत सीमा हैदरचे.
भारतातील आपल्या प्रियकरासाठी धर्म आणि देश दोन्हींचा त्याग करणारी सीमा पहलगाममधील हल्ल्यानंतर व्यथित झाली आहे. या हल्ल्यानंतर आपले जीवन पूर्णपणे बदलल्याचा दावा तिने केला.
भारत सरकारने पाकिस्तानसोबतचे सर्व द्विपक्षीय संबंध तोडून टाकत येथे वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवायला सुरूवात केली आहे. आता आपल्यावरही मायदेशी परतण्याची वेळ तर येणार नाही ना या विचाराने सीमा चिंतेत आहे.
सीमा ही २०२३ मध्ये प्रियकर सचिन मीणा याच्यासोबत विवाह करण्यासाठी भारतामध्ये आली होती. तसे पाहता सीमाचे लग्न आधीच झाले होते. तिला चार मुलेही आहेत पण म्हणतात ना प्रेम आंधळे असते. सोशल मीडियावरून सचिनशी ओळख झाल्यानंतर सीमाचे जीवनच बदलले.
संवादाचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात कधी झाले ते कळलेच नाही. पाकिस्तानच्या सिंधमध्ये राहणारी सीमा आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. त्यांची ही अनोखी प्रेमकथा नेटविश्वामध्ये चर्चेचा विषय ठरली होती. येथे दोघांचा राजा-राणीचा संसार सुरू असताना पहलगामच्या हल्ल्यानंतर सीमाच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा मोठे वादळ आले आहे.
समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत तिने म्हटले आहे की मला पुन्हा पाकिस्तानात जायचे नाही. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींना मला भारतातच राहू द्यावे अशी विनंती मी करणार आहे. विशेष म्हणजे सचिनसोबत विवाह झाल्यानंतर सीमाने हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. सध्या चोहोबाजूंनी टीकेचा मारा होत असल्याने ती व्यथित झाल्याचे दिसते.
ती पाकिस्तानी नाही - वकील
सीमाचे वकील ॲड. ए.पी. सिंह म्हणाले की सीमा ही काही पाकिस्तानी नागरिक नाही. सचिन मीणासोबत विवाह केल्यानंतर हे दाम्पत्य ग्रेटर नोएडामध्ये वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका मुलीलाही जन्म दिला होता. भारती मीणा असे तिचे नाव आहे. सीमाचे नागरिकत्व पतीशी जोडले गेले आहे त्यामुळे तिला केंद्राचे निर्देश लागू होत नाहीत.