MI vs LSG : लखनौ सुपर जायंट्सचा हिशोब करण्यासाठी पलटण सज्ज, मुंबई इंडियन्स विजयी ‘पंच’ लगावणार?
GH News April 27, 2025 12:06 AM

आयपीएल 2025 मध्ये रविवारी 27 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्याच सामन्याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसमने असणार आहेत. ऋषभ पंत हा लखनौचं तर हार्दिक पंड्या पलटणचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील नववा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची ही एकमेकांसमोर येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे.याआधी झालेल्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सने मुंबईवर मात केली होती. त्यामुळे पलटण लखनौचा हिशोब करण्यासाठी सज्ज आहे.

लखनौचा 12 धावांनी विजय, पलटणकडे परतफेडीची संधी

लखनौ आणि मुंबई या मोसमात 4 एप्रिलला आमनेसामने आले होते. या हायस्कोअरिंग आणि रंगतदार सामन्यात मुंबईला अवघ्या 12 धावांनी पराभूत व्हावं लागलं होतं. मुंबईने 204 धावांच्या प्रत्युत्तरात 191 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे मुंबई एकाना स्टेडियममध्ये 12 धावांनी अपयशी ठरली होती. त्यामुळे पलटण आता आपल्या घरच्या मैदानात लखनौचा हिशोब बरोबर करण्याच्या तयारीने उतरणार आहे.

लखनौसमोर पलटणा रोखण्याचं आव्हान

दरम्यान लखनौसमोर मुंबईची विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे. मुबईची या हंगामात अडखळत सुरुवात झाली होती. मंबईला सलग 2 पराभवानंतर तिसऱ्या सामन्यात पहिलं यश मिळालं होतं. त्यानंतर मुंबईला पुन्हा 2 सामने गमवावे लागले. मात्र त्यानंतर पलटणने मुसंडी मारली. मुंबईने सलग 4 सामने जिंकले आणि दणक्यात कमॅबक केलं. मुंबईने दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि पुन्हा हैदराबादला लोळवलं. त्यामुळे लखनौसमोर मुंबईचा सुस्साट सुटलेला विजय रथ रोखण्याचं आव्हान असणार आहे.

मुंबईचा सामन्याआधी जोरदार सराव

लखनौ मुंबईवर वरचढ

दरम्यान हेड टु हेड आकडे पाहता लखनौ सुपर जायंट्स 5 वेळा चॅम्पियन्स असलेल्या मुंबईवर वरचढ राहिली आहे. लखनौ विरुद्ध मुंबई यांच्यात 7 सामने खेळवण्यात आले आहेत. लखनौने या 7 पैकी तब्बल 6 सामन्यांमध्ये मुंबईवर मात केली आहे. तर मुंबईला फक्त एकच सामना जिंकण्यात यश आलं आहे. त्यामुळे मुंबई लखनौवर मात करत सलग पाचवा विजय मिळवणार का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं बारीक लक्ष लागून राहिलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.