Ajit Pawar On Cabinet Expansion : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. 2024 सालची विधानसभा निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र मिळून लढवली. त्याचेच फळ म्हणून आज हे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. दरम्यान, तीन पक्ष एकत्र असल्यामुळे महायुतीत वेगवेगळ्या कारणांमुळे रस्सीखेच पाहायला मिळते. मंत्रिमंडळ विस्तारावेळी अशीच चढाओढ पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे या तिन्ही पक्षांतर्गतही मंत्रिपदाला गवसणी घालण्यासाठी शर्यत लागली होती. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलंय.
अजित पवार हिंगोलीत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. भाषणादरम्यान त्यांनी मंत्रिमंडळाची खांदेपालट अर्थात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केलं. “अडीच वर्षामध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार, असा शब्द दिलेला आहे. तो शब्द मी पाळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका,” असं अजित पवार यांनी म्हटलंय.
राज्यात 2024 सालची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. यावेळी आम्हालाच महत्त्वाची खाती मिळावी, यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शेवटी एकमत झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार जाहीर करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांच्या पक्षाने मंत्रिपदं देताना अडीच वर्षांचा विशेष फॉर्म्यूला ठरवला होता.
सध्या ज्या नेत्यांना मंत्रिपदं देण्यात आली होती, त्यांना पुढच्या अडीच वर्षांनी खुर्ची खाली करावी लागणार, असे त्यावेळी ठरले होते. म्हणजेच या पुढच्या अडीच वर्षांनी नव्या नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्याचा फॉर्म्यूला समोर ठेवला होता. याच फॉर्म्यूलाचा अजित पावर यांनी हिंगोलीत नव्याने उल्लेख केला आहे. मी नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार, असं असं मी म्हटलं होतं, तो शब्द मी पाळणार, असं अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार यांच्या या विधानानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात नेमके कोणते बदल होणार? बदल झालेच तर कोणत्या नवीन लोकांना मंत्रिपदाची खुर्ची भेटणार? याची चर्चा आतापासूनच रंगली आहे. विशेष म्हणजे पक्षातील असंतुष्ट नेत्यांना अजित पवार कोणती मंत्रिपदं देणार? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.