नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना नेरूळ पोलिसांनी शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. या मुलांनी विविध ठिकाणांवरून १३ दुचाकी चोरल्याचे तपासात आढळले आहे. पोलिसांनी मुलांनी चोरलेल्या व वेगवेगळ्या ठिकाणी सोडून दिलेल्या चार लाख ३२ हजारांच्या १३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दुचाकीवरून फिरण्यासाठी त्यांनी चोरी केल्याचे तपासात आढळून आले आहे.
नेरूळ पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक बुधवारी गस्त घालत असताना दोन अल्पवयीन मुले नेरूळमधील वंडर्स पार्क भागात दुचाकीवरून संशयास्पद फिरताना आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे असलेली दुचाकी २७ मार्चला नेरूळ भागातून चोरली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिक चौकशीत त्यांनी नेरूळ, खारघर, कोपरखैरणे, उरण, सानपाडा व डोंगरी या भागातून दुचाकी चोरल्याचे कबूल केले. तसेच त्यातील पेट्रोल संपल्यामुळे त्या वेगवेगळ्या ठिकाणी सोडून दिल्याची माहिती दिली. त्यानंतर या मुलांनी पेट्रोल संपल्यामुळे ज्या ठिकाणी चोरलेल्या दुचाकी सोडून दिल्या होत्या, त्या ठिकाणावरून १३ दुचाकी हस्तगत केल्या. त्यामुळे नवी मुंबईतील १२ व मुंबईतून एक असे १३ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
------------
केवळ रायडिंगसाठी चोरी
चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेली दोन्ही अल्पवयीन मुले रस्त्यालगत पार्क असलेल्या दुचाकी हेरून त्यांच्याजवळ असलेल्या चावीने ते चोरून नेत होते. तसेच त्यातील पेट्रोल संपेपर्यंत ते दुचाकी फिरवत होते. ज्या ठिकाणी त्या गाडीमधील पेट्रोल संपत असे, त्याच ठिकाणी ती दुचाकी रस्त्यालगत उभी करून जात असल्याचे त्यांच्या चौकशीत उघड झाले आहे. फक्त रायडिंगसाठी ते दुचाकी चोरत असल्याचे तपासात आढळून आले आहे.