परीक्षण- अंतर्मुख करणारे अनुभवकथन
Marathi April 27, 2025 08:25 AM

>> संजय बच्चव

आयुष्याकडे डोळसपणे पाहत, रडत रडत जगण्यापेक्षा लढत लढत जगण्याची गुरुकिल्ली देणारे अनुभव कथन. पराकोटीच्या आशावादाने कर्करोगावर केलेली मात म्हणजेच आशा नेगी यांनी फेब्रुवारी ते सप्टेंबर 2023 या कालावधीत रोजनिशीच्या स्वरूपात केलेल्या अनुभव कथनाचे ग्रंथस्वरूप.

कविता, अभिनय, मॉडेलिंग, सौंदर्य स्पर्धा या विविध क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करणाऱया आणि रियल इस्टेट क्षेत्रात यशस्वी उद्योजिका म्हणून कर्तृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटवणाऱया आशा नेगी यांना दुर्दैवाने वयाच्या 43 व्या वर्षी ब्रेस्ट कॅन्सर झाला. सतत आठ महिने शस्त्रक्रिया, वीस रेडिएशन्स, सहा किमो, सतरा टार्गेटेड इंजेक्शन्स, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दोन शिरांना झालेली इजा आणि त्यामुळे जवळजवळ निकामी अवस्थेत गळ्यात अडकून पडलेला डावा हात, काखेत झालेली तीव्र वेदना देणारी भळभळती जखम आणि शेवटी कर्करोगावर केलेली मात! हा संपूर्ण प्रवास त्यांनी ‘जे होतं ते चांगल्यासाठीच,’ असं मनाला सांगत केला.

हे पुस्तक वाचत असताना शेवट माहीत असूनदेखील आपण उत्कंठेने आणि श्वास रोखून एखादा चित्रपट बघावा अगदी तसाच अनुभव येतो.

निसर्गावर मात करून जन्माला आलेल्या आणि अठराव्या वर्षी वडिलांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलण्याची पार्श्वभूमी  लेखिकेला आहे. सहानुभूती नको आणि इतरांना ताण येऊ नये यासाठी अगदी स्वतच्या आईलादेखील या आजाराची कल्पना दिली नाही. एवढेच नाही तर या आजाराबद्दल कळले, तर त्यांना सहन होणार नाही; परिणामी आपल्या हळव्या पतीला सांभाळणे त्रासाचे ठरेल, म्हणून त्यांनादेखील सांगितले नाही.

या कालावधीत ऑफिसच्या कामासाठी विविध शहरांमध्ये होणाऱया मीटिंग्ज, कुटुंबातील सदस्यांचे किंवा मित्रांचे वाढदिवस, मित्र परिवाराचे गेट-टुगेदर अशा कार्यक्रमांचा समावेश होता. आनंदाच्या प्रसंगाप्रमाणेच आजाराच्या विविध टप्प्यांवरदेखील त्यांनी आनंदाने फोटोशूट करून घेतले. किमोथेरपी नंतर ‘मी अशीही सुंदरच दिसते,‘ असे म्हणत फोटोशूट करणे, आनंदाने विग खरेदी करणे, उपचार सुरू असताना योग्य आहाराचे नियोजन करणे, पूर्वी दररोज दहा किलोमीटर चालण्याची सवय होती; परंतु या अवस्थेतदेखील नियमितपणे जमेल तसा आणि तितका व्यायाम सुरू ठेवला. आपल्याला होणाऱया वेदनांमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू नये, यासाठी ‘तुम्ही माझ्यासाठी नेहमी वागता तसेच वागा. पेशंटसारखी वागणूक देऊ नका’, असं सांगत वेगळ्या बेडरूममध्ये राहून होणाऱया असह्य वेदना एकटीने सहन केल्या. हे सर्व वाचताना लेखिकेच्या अंगी असणारा पराकोटीचा संयम लक्षात येतो.

कर्करोग झाल्यामुळे त्रागा न करता स्वतला दुर्दैवी न समजता, ‘खूप स्ट्राँग राहायचे, खूप आत्मविश्वास बाळगायचा, आनंदी राहायचे, आयुष्यात कधीच हार मानायची नाही,’ या विचारावर लेखिकेची ठाम श्रद्धा असल्यामुळे या पुस्तकाच्या माध्यमातून त्या ‘आनंदी राहणं आणि भरभरून जगणं’ हा संदेश देतात. एका सेवाभावी संस्थेत कार्यरत असणाऱया मित्राकडून आर्थिक मदतीचा प्रस्ताव आल्यानंतर मी माझा खर्च करण्यास सक्षम असल्यामुळे मी इतर कुण्या गरजूच्या हक्कावर गदा आणू इच्छित नाही, असे सांगणारी लेखिका वेगळ्याच उंचीवर असल्याचे जाणवते. किरकोळ बाबींचा बाऊ करणाऱया प्रत्येकाला अंतर्मुख करणारे हे पुस्तक जगण्यासाठी नवी जिद्द, नवी दिशा, नवा आत्मविश्वास देते.

‘प्रॉब्लेम इज प्रोग्रेस’ असे मानणाऱया लेखिका आशा नेगी यांच्या अंगी असणारा पराकोटीचा आशावाद, सकारात्मकता, काटेकोर नियोजन आणि स्वतवर प्रेम करण्याची वृत्ती वाचकाला केवळ प्रेरणा देत नाही, तर जीवनाविषयी, खासगी आरोग्य व्यवस्थेतील भोंगळ कारभार आणि बेजबाबदारपणामुळे रुग्णांना होणाऱया लुटीविषयी जागरूक करतात.

ब्युटी ऑफ लाइफ

द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर

लेखक आशा नेगी

प्रकाशक नवीन आयआरए पब्लिशिंग हाऊस

किंमत: 350 रुपये

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.