काही लोक घराच्या…मी शेतकऱ्याचा मुलगा…एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल!
GH News April 27, 2025 04:08 PM

Eknath Shinde : पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्याची तजवीज केली. दरम्यान, आज त्यांनी याच हल्ल्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ठाकरे कुटुंब सध्या परदेश दौऱ्यावर आहे. हाच धागा पकडून एकनाथ शिंदेंनी हल्लाबोल केलाय. ते बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या सभेत बोलत होते.

मी त्या ठिकाणी जाणं हे माझं…..

“हा एकनाथ शिंदे लांबून बोलणारा नाही. मी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत कुटुंबीयांना भेटलो. मी त्यांच्या भावना पाहिल्या, मी लाडक्या बहिणींच्या भावना पाहिल्या. ते म्हणाले तुम्ही आलात, आता आम्हाला खात्री आहे की, आम्ही पुन्हा सुरक्षित सुखरुप घरी जाणार. मी तुम्हाला एवढंच सांगतो की पहलगाममधील हल्ला हा दुर्दैवी होता. म्हणूनच मी त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होतं. पण त्यातही राजकारण केलं जात आहे,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

मी गावाला गेलो की..

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी गेले होते. तिथे ते काही दिवस मुक्कामी राहिले होते. शिंदेंच्या याच दौऱ्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. याचाही समाचार एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात घेतला. “मी गावाला गेलो की राजकारण केलं जातंय. मी शेती करायला गेलो, असं हिणवलं जातं. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी शेती करायला नाही जाणार तर मग कशाला जाणार. काही लोक घरातून बाहेर पडतच नाहीत. ते घराच्या बाहेर पडले की पार देशाच्या बाहेरच जातात,” अशी टोलेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.

काही लोक घरातून बाहेर पडले की…

“मी घरातून बाहेर पडतो. पण काही लोक घरातून बाहेर पडतच नाहीत. पण मी जेव्हा-जेव्हा संकट येत तेव्हा मी तिकडे जातो. काही लोक घरातून बाहेर पडले की ते पार देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ,” असा हल्लाबोल एकनाथ शिंदे ठाकरेंचे नाव न घेता केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.