India Tri-Series Live Streaming: टीम इंडिया आजपासून तिरंगी मालिकेत खेळणार! कुठे आणि कधी पाहणार सामने?
esakal April 27, 2025 03:45 PM

भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू असली, तरी भारतीय महिला संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तिरंगी मालिका खेळली जाणार आहे. भारतात या वर्षाच्या अखेरीस महिला वनडे वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे.

त्यामुळे ही वनडे तिरंगी मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या तिरंगी मालिकेत भारतीय महिला संघासह यजमान श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ सहभागी आहेत.

ही तिरंगी मालिका २७ एप्रिल ते ११ मे दरम्यान खेळवली जाणार आहे. पहिला सामना २७ एप्रिल रोजी भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा झाली होती.

भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिका लॉरा वोल्वार्ड्टच्या नेतृत्वात, तर श्रीलंका चामरी अट्टापट्टूच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.

मालिकेचे स्वरुप

या मालिकेत साखळी फेरीत तिन्ही संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी २ सामने खेळणार आहेत. म्हणजे साखळी फेरीत एकूण ४ सामने होतील. त्यानंतर सर्वाधिक गुण असणारे दोन संघ अंतिम सामना ११ मे रोजी खेळतील.

या मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होतील, तसेच या मालिकेतील सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत.

लाईव्ह कुठे पाहाणार सामने?

हे सामने श्रीलंकेत टीव्हीवर स्थानिक चॅनेलवर लाईव्ह प्रदर्शित होणार आहेत. मात्र भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशात टीव्हीवर या मालिकेतील सामने लाईव्ह पाहाता येणार नाहीत.

मात्र ओटीटी ऍपवर हे सामने लाईव्ह प्रदर्शित होणार आहेत. श्रीलंकेत ThePapare.com वेबसाईट आणि फेसबुक चॅनेलवर प्रदर्शित होईल.

भारतात FanCode ऍप आणि वेबसाईटवर हे सामने लाईव्ह दिसणार आहेत, तर दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांतील प्रेक्षकांना सामन्यांचा आढावा घेण्यासाठी श्रीलंका क्रिकेटच्या युट्युब चॅनलवर अवलंबून रहावे लागणार आहे.

मालिकेतेचे वेळापत्रक (वेळ: स. १० वाजता)
  • २७ एप्रिल : भारत-श्रीलंका

  • २९ एप्रिल : भारत-दक्षिण आफ्रिका

  • १ मे : श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका

  • ४ मे : भारत वि. श्रीलंका

  • ६ मे : भारत वि. दक्षिण आफ्रिका

  • ८ मे : श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका

  • ११ मे : अंतिम फेरीची लढत

मालिकेसाठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काश्वी गौतम, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, श्री चरणी, शुची उपाध्याय

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.