इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा ४४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शनिवारी (२६ एप्रिल) ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच पावसाला सुरुवात झाली.
बराच काळ पाऊस न थांबल्याने अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. त्यामुळे पंजाब किंग्स ९ सामन्यांनंतर ११ गुणांवर पोहचले आहेत, तर संघाचे ९ सामन्यांनंतर ७ गुणच आहेत.
गतविजेत्या कोलकाता संघासाठी यंदाचा हंगाम फारसा चांगला ठरलेला नाही. त्यांना ९ सामन्यांत ३ विजय आणि ५ पराभवांना सामोरे जावे लागले आहे. नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाने काही सामने अगदी विजयाच्या जवळ जाऊन पराभूत झाले आहे. पण त्यांचे ९ सामन्यांनंतर ७ गुण असले, तरी अद्याप त्यांच्यासाठीही प्लेऑफचे दरवाजे बंद झालेले नाहीत. त्यांना अद्यापही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. पण त्यांच्यासमोरचा मार्ग कठीण आहे.
कोलकाताची जमेची बाजू अशी आहे की त्यांना नेट रन रेट खूप खराब नाही. त्यांचा +०.२१२ असा नेट रन रेट आहे. ते सध्या सातव्या क्रमांकावर आहेत. कोलकाताचे आता आणखी ५ सामने बाकी आहेत.
कोलकाताला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर आता उर्वरित पाचही सामने जिंकावेच लागतील, जर असे झाले तर ते १७ गुणांपर्यंत पोहचतील. तसेच त्यांना प्लेऑफ खेळण्याची संधी मिळू शकते. पण त्यांना याचीही आशा बाळगावी लागेल की किमान ६ संघ १६ गुणांपेक्षा अधिक गुण मिळवता कामा नयेत.
याशिवाय कोलकाताने त्यांना नेट रन रेटही चांगला राखून ठेवावा लागणार आहे. कारण आयपीएलमध्ये प्लेऑफच्या शर्यतीत नेट रन रेटही खूप महत्त्वाचा ठरतो. दरम्यान, कोलकाताला आणखी एक पराभव परवडू शकतो, पण तसं झालं तर ते १५ गुणांपर्यंतच पोहचू शकतात. असे झाले, तर त्यांना दुसऱ्या संघांच्या निकालावरही अवलंबून रहाणे लागेल. तसेच जर ते अजून दोन सामने पराभूत झाले, तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.
कोलकाताला आगामी काळात दिल्ली कॅपिटल्स (२९ एप्रिल), राजस्थान रॉयल्स (४ मे), चेन्नई सुपर किंग्स (७ मे), सनरायझर्स हैदराबाद (१० मे) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (१७ मे) या संघांविरुद्ध सामने खेळायचे आहेत.
यातील राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांविरुद्ध होणारे सामने कोलकाताला घरच्या मैदानावर खेळायचेत, तर इतर सामने बाहेरच्या मैदानात खेळायचे आहेत.
शनिवारच्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने २० षटकात ४ बाद २०१ धावा केल्या होत्या. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८३ धावा केल्या. तसेच प्रियांश आर्यने ३५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावा केल्या.
कोलकाताकडून वैभव अरोराने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कोलकाता संघ उतरला होता. पण एकच षटकानंतर पावसाला सुरुवात झाली. पहिल्या षटकात कोलकाताने बिनबाद ७ धावा केल्या होत्या. सुनील नरेनने ४ आणि रेहमनुल्ला गुरबाजने १ धाव केली होती.