गाय वाटप घोटाळ्यातील IAS अधिकारी शुभम गुप्ताची पुन्हा चौकशी; आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती
Marathi April 27, 2025 06:24 PM

गॅचिरोली बातम्या: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत गाय वाटप घोटाळा उघडकीस आला होता. या घोटाळ्यात दोषी आढळलेले भामरागडचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी आयएएस शुभम गुप्ता यांची पुन्हा विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके (Ashok Uike) यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना दिली. शिवाय गेल्या आठ दिवसांपासून शुभम गुप्ता (IAS Officer Shubham Gupta) यांची विभागीय चौकशी सुरू असून दोषींना कदापी पाठीशी घातले जाणार नाही, असेही मंत्री अशोक उईके यांनी यावेळी म्हटले आहे.

गाय वाटप घोटाळा पुन्हा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?

तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांनी लाभार्थ्यांना गाय वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा केला होता. अनेक तक्रारीनंतर त्यांची चौकशी झाली आणि ते दोषी आढळले होते. आवाज उठवणाऱ्यांवर खोटे गुन्हे नोंदवण्याचे बनावट नोटीस बजावल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. या संदर्भात आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रकरणाची चौकशी केली होती. त्यांनी शासनाकडे सादर केलेल्या 507 पानांच्या अहवालात गुप्ता  दोषी असल्याचे म्हटले आहे. यानंतरही गुप्ता यांच्यावर कारवाई झाली नव्हती.

गडचिरोलीतून बदली झाल्यानंतर गुप्ता यांची सातारा त्यानंतर विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली. मात्र अवघ्या 25 दिवसात त्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून शुभम गुप्ता यांची विभागीय चौकशी सुरू असून दोषींना कदापी पाठीशी घातले जाणार नाही, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोली दौऱ्यात दिली आहे.

रानटी हत्तींच्या हल्ल्यात तीन महिला जखमी

गेल्या चार वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात वावर असलेल्या रानटी हत्तींचा धुमाकूळ आता गडचिरोली तालुक्यात सुरू झाला आहे. शुक्रवारी रानटी हत्तींनी गडचिरोली लगतच्या वाकडी जंगल परिसरामध्ये प्रवेश केला. गेल्या तीन-चार दिवसांपासून गडचिरोली तालुक्यातील वाकडी, मसली, कृपाळा हिरापूर या गावांमध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. आज सकाळी कृपाळा येथील दहा-बारा महिला गावानजीच्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. एवढ्यात 18 हत्तींच्या कळप येथे पोहोचला. यातील काही हत्तीने तीन महिलांवर हल्ला केला. यात सुशीला मेश्राम, योगिता मेश्राम आणि पुष्पा वरखडे या महिला जखमी झाल्या. सुशीला मेश्राम गंभीर जखमी असल्याने त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे. तर इतर दोघींवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिवाय माजी सरपंच चरणदास बोरकुटे यांच्या तीन एकरातील धान पीक तर यशवंत दरेकर यांच्या शेतातील शेड उध्वस्त केले.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.