रक्ताच्या नद्या वाहतील अशी भारताला धमकी दिली, आता नेत्याचं कुटुंबासह पाकिस्तानातून पलायन
esakal April 28, 2025 03:45 AM

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. सिंधू नदी करार भारतानं रद्द केलाय. यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झालीय. तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्यानं आता देश सोडला आहे.

सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी कुटुंबासह कॅनडाला पलायन केलंय. धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते पाकिस्तान सोडून गेले आहेत. बिलावल भुट्टो, बख्तावर भुट्टो आणि असिफा भुट्टो कॅनडाला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानच्या पीपीपी पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी म्हटलं होतं की, सिंधू नदीच्या काठावर उभा राहून मला भारताला सांगायचंय की सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील. आमचं पाणी या नदीतून वाहील किंवा त्यांचं रक्त वाहील. बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबियांनी आता पाकिस्तानच सोडलं आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना धर्म विचारून मारण्यात आलं होतं. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास सांगितलंय. दरम्यान, भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना परदेशात पाठवून दिलंय. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनीही कुटुंबियांना परदेशात पाठवून दिलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.