अहिल्यानगर (शिर्डी) : जम्मू-काश्मीरमच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतंप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ५ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचं सांगण्यात आलं. मात्र, २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही, सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय,' असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकरांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
'पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अटारी वाघा बॉर्डर १ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यासोबतच, सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचं सांगण्यात आलं. मात्र, हा करार रद्द केल्याचं खोटं सांगितलं जातंय, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.' पाकिस्तानला पाणी बंद केल्यासंदर्भाने दिलेलं पत्रच त्यांनी दाखवलं. 'या पत्रामध्ये कुठेही पाणी बंद केल्याचा उल्लेख नाही. धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही, असा कुठेही उल्लेख नाही. याचाच अर्थ इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही,' असंही यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात झालेल्या हत्याकांडाबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'जातीच्या बाहेर जाऊन लग्न करणाऱ्यांची काळजी सरकारने घेतली पाहिजे. जातीच्या बाहेर जाऊन लग्न केलं आणि कुटुंबाने जर हिंसा केली तर त्यापासून संरक्षण सरकारने दिलं पाहिजे,' असं त्यांनी म्हटलं आहे.