हो, तुम्ही बरोबर वाचलंत! काहीही न करता शांत बसून राहणे हीसुद्धा एक कला आहे. वरवर पाहता हे खूप सोपं वाटतं, कारण त्यात पारंगत होण्यासाठी खरोखर काहीच करायचं नसतं; पण अनुभवाने लक्षात येतं, की हे वाटतं तेवढं हे सोपं नाही. गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र, ही कला आत्मसात करणं एक उत्तम कौशल्य ठरतं.
अर्थात, ती प्रत्यक्षात उतरवणं खूप अवघड जातं. एकदा ही कला आत्मसात केली, की तुमचं गुंतवणुकीचं काम अगदी सोपं होतं आणि संभाव्य तोटासुद्धा तुम्ही टाळू शकता. अगदी अलीकडील दिवसातील काही उदाहरणांवरून हे अगदी सहज समजू शकेल.
शेअर बाजार आणि सोने
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे जगभरातील शेअर बाजारांना धक्का बसला. भारतीय शेअर बाजारसुद्धा त्याला अपवाद नव्हता. जानेवारी २०२५ च्या सुरुवातीला ८० हजार अंशांच्या आसपास पोहोचलेला ‘सेन्सेक्स’ मार्चमध्ये ७४ हजार अंशांपर्यंत कोसळला. अशावेळी जुन्या गुंतवणूकदारांनी काहीही न करणे अपेक्षित होते.
परंतु, घाबरून जाऊन काही गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक विकून टाकली आणि तोटा सहन केला. आता एप्रिलच्या शेवटी ‘सेन्सेक्स’ने पुन्हा ८० हजारांची पातळी ओलांडली. अशा गुंतवणूकदारांनी या काळात काहीही केलं नसतं, तर त्यांचा तोटा झाला नसता. याच काळात शेअर बाजाराच्या अगदी उलट परिस्थिती सोन्यातील बाजारभावात दिसून आली.
प्रति दहा ग्रॅममागे ८० ते ८५ हजार रुपये भाव असलेले सोने हा हा म्हणता वाढत गेले आणि गेल्या आठवड्यात तर त्याने एक लाख रुपयांच्या पातळीला स्पर्श केला. अशावेळी शेअर बाजारात तोटा सहन करून विकलेली रक्कम काही गुंतवणूकदारांनी चढ्या भावातील सोने खरेदी करण्यात गुंतवली.
असं करण्याऐवजी आधीपासूनच या दोन्ही गुंतवणूक पर्यायात आपली गुंतवणूक विभागून टप्प्याटप्प्याने आणि नियमितपणे करण्याचा निर्णय एकदाच घेतला असता आणि त्यानंतर त्या गुंतवणूक प्रक्रियेत काहीही ढवळाढवळ केली नसती, तर अशा गुंतवणूकदारांना अधिक फायदा झाला असता.
काही न करण्याची कला !
गुंतवणूक करताना काही न करण्याची कला नक्की काय सांगते ते समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याच्या पायऱ्या समजावून घेऊ या. पहिली पायरी म्हणजे गुंतवणूक सुरू करण्याआधी त्याचा पूर्णपणे अभ्यास करणे. दुसरी पायरी म्हणजे त्या पर्यायाची इतर पर्यायांसोबत तुलना करणे.
तिसरी पायरी म्हणजे आपल्याला योग्य वाटलेल्या पर्यायांत किंवा शक्य असल्यास सर्वच पर्यायांत गुंतवणूक करण्यास हळूहळू सुरूवात करणे आणि त्यात एकदा आत्मविश्वास आल्यानंतर शेवटची पायरी म्हणजे ‘काहीही न करणे’! ही कला आपला वेळ , पैसे आणि श्रम वाचवतेच; शिवाय आपली मनःशांतीदेखील टिकवून ठेवते.
धरी धीर...
जगप्रसिद्ध गुंतवणूकतज्ज्ञ चार्ली मुंगेर म्हणायचे, की धीर धरण्याची क्षमता निर्माण केली तर गुंतवणूक यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होतो. मुंगेर यांचा सल्ला फक्त शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी आहे असं नव्हे, तर गुंतवणुकीच्या सर्वच पर्यायांसाठी तो लागू होतो. त्यासाठी गुंतवणुकीच्या प्रक्रियेत आपण सातत्याने लुडबुड करत राहिलो, तरच आपल्याला फायदा होईल, हा गैरसमज डोक्यातून काढून टाकला पाहिजे.
ज्याप्रमाणे आपण कुंडीत लावलेले रोपटं मातीत किती खोलवर रुजलेलं आहे, हे पाहण्यासाठी रोज ते बाहेर काढून बघत नाही; त्याचप्रमाणे एकदा सुरू केलेली गुंतवणूक किती फायद्यात आहे, याचा सतत आढावा घेत बसू नये. थोडक्यात, ‘बाय राइट अँड सीट टाइट’ या इंग्रजी उक्तीला अनुसरून काहीही न करण्याची कला आत्मसात करायला शिकावी.