कुंडल : येथील जैन तीर्थक्षेत्र असलेल्या पहाडावरील गिरी पार्श्वनाथ जैन मंदिरातील (Giri Parswanath Jain Temple) मूर्तींची विटंबना झाल्याचा प्रकार सकाळी निदर्शनास आला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध कुंडल ठाण्यात (Kundal Police Station) गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा जैन समाज संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
कुंडल येथील सुकुमार जीवंधर उपाध्ये यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, अशी पहाडावर असलेल्या गिरी पार्श्वनाथ जैन मंदिरातील मूर्तींची मोडतोड करण्यात आली आहे. अज्ञात इसमाने धार्मिक भावना दुखावणेचे उद्देशाने हा प्रकार केला. तीन मूर्तींचे नाक, डोळे यांचे नुकसान केले आहे.
शनिवारी सकाळी सात ते आज (रविवार) सकाळी सात या दरम्यानच्या काळात हा प्रकार घडला आहे. मूर्ती विटंबनेच्या प्रकारामुळे जैन समाजाने संताप व्यक्त केला. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केली. सोमवारी ते घटनास्थळी भेट देणार आहेत. श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्धाअतिश क्षेत्र ट्रस्ट कुंडल व तीर्थराज नवग्रह दिगंबर जैन मंदिर कुंडल यांनी या प्रकरणी तातडीने तपासाची मागणी केली.
साहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील म्हणाले, ‘सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी फिक्स पॉईंट लावण्यात आलेला असून, सदर ठिकाणी श्वान पथक, फिंगरप्रिंट व सायबरची टीम पोहोचली आहे. योग्य ती सर्व खबरदारी घेत आहोत.’ घटनास्थळी उपाधीक्षक सचिन थोरबोले, प्रभारी महसूल नायब तहसीलदार कामिनी नगरे, साहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी भेट दिली.
यड्रावकर यांचा अधीक्षकांना फोनआमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींना गजाआड करण्याची सूचना केली. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनीही घटनास्थळावरील प्रकाराची माहिती घेतली. जैन विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.