खान युनिस : शस्त्रसंधीच्या सहा आठवड्यांच्या टप्प्यात काही अपहृतांची सुटका झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी बोलणी करण्याऐवजी इस्राईलने गाझा पट्टीत पुन्हा हल्ले सुरू केल्याच्या घटनेलाही आता दोन महिने पूर्ण होत आले आहेत.
तसेच इस्राईलने इजिप्तच्या सीमेवरून येणारी मानवतावादी मदत बंद केली आहे. यामुळे गाझातील सामान्य नागरिकांना अन्न-पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने लहान मुलांचे पोट भरण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे.
इस्राईलकडून संपूर्ण गाझा पट्टीत हल्ले सुरू असल्याने निर्वासितांसाठी ठिकठिकाणी छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. खान युनिस शहराच्या जवळ असलेल्या एका छावणीत राहणाऱ्या मरियम अल नज्जर यांनी आणि छावणीतील इतर लोकांच्या स्थितीचे वर्णन केले. ‘‘एक किलो मटार आणि काही गाजरे पाण्यात उकडली, त्यात थोडा मसाला टाकला आणि एक वाटी हे मिश्रण एक छोटी ताटली भरून भाताबरोबर दिले की त्या दिवसाचे जेवण झाले, अशी आमची स्थिती आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
गाझामधील सुमारे २२ लाख लोकांपैकी बहुतांश लोक सध्या बंद डब्यातून कधी तरी मिळणाऱ्या भाज्या, भात आणि मसूर डाळ यावरच जगत आहेत. मांस, दूध, चीज आणि फळे त्यांच्या आहारातून गायब झाली आहेत. ब्रेड आणि अंडी क्वचितच मिळतात. यामुळे लहान मुलांनाही पोषण आहार मिळत नसल्याने त्यांच्यात कुपोषणाचा धोका वाढण्याचा अंदाज आरोग्य संघटनांनी व्यक्त केला आहे. रुग्णांना औषधे मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. हल्ल्यातील जखमींना उपचार मिळतील, याचीही शाश्वती नसते.
सुनसान बाजारपेठखान युनिसमध्ये अजूनही बाजार भरतो; मात्र एरवी गजबजलेली असणाऱ्या बाजारपेठेत आता तुरळक गर्दी असते. अनेक गाळे रिकामेच असतात. काही ठिकाणी केवळ अंडी, काही ठिकाणी एक-दोन भाज्या, काही ठिकाणी मटार अशा किरकोळ वस्तू असतात. एक किलो टोमॅटोची किंमत ५० शेकेल (१४ डॉलर) इतकी झाली आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी किलोभर टोमॅटो तीन ते चार शेकेल या किमतीला मिळत असत.