२२ एप्रिल रोजी संपूर्ण भारताला धक्का बसला. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. यातील अनेक जण पर्यटक होते. त्यामुळे भारतात हळहळ आणि संतापाची वाट उसळली. देशभरात याचे पडसाद उमटले असून सुरक्षाही कडक करण्यात आली आहे.
याचदरम्यान भारतात इंडियन प्रीमियर लीग (IPL) खेळवली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेदरम्यानही सुरक्षा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व स्टेडियमच्या आसपासचे हवाई क्षेत्र सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने अँटी ड्रोन सिस्टीम 'वज्र सुपर शॉट' सुरू केली आहे.
वज्र सुपर शॉट ही भारतीय अँटी ड्रोन सिस्टीम आहे. चेन्नईस्थित बिग बँग बूम सोल्युशन्स (BBBS) द्वारे विकसित केलेली ही सिस्टीम आहे. वज्र सुपर शॉट हे हाताने वापरण्याच येणारे शस्त्र असून त्यामुळे चार किलोमीटरच्या परिघातातील ड्रोन शोधण्याची त्यात क्षमता आहे. तसेच ड्रोनचे कम्युनिकेश सिग्नल जाम करून त्यांना निष्क्रिय करण्याची क्षमताही त्यात आहे.
शनिवारी (२६ एप्रिल) रोजी कोलकातामध्ये झालेल्या पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यापासून या सिस्टीमची सुरुवात आयपीएल २०२५ मध्ये करण्यात आली आहे. याशिवाय देखील आता उर्वरित सर्व सामन्यांसाठी ही स्टिस्टीम सुरू करण्यात येणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा हा देशातील चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत अनेकांनी भाष्य केले आहे. दरम्यान,पहलगाम हल्ल्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही निषेध व्यक्त केला आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाकिस्तानसोबतचे सर्व क्रिकेट संबंधही तोडण्याबद्दल भाष्य केले. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. ही संघटना पाकिस्तानमधील लष्कर-ए-तायबा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे.
यानंतर पाकिस्तानविरुद्धही देशभरातून संताप व्यक्त होत असून भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाईही सुरू केली आहे. या दोन देशातील ताणलेल्या संबंधांमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका होत नाहीत.
हे दोन संघ केवळ आशियाई आणि आयसीसी स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात. पण आता परिस्थिती आणखी चिघळली असल्याने या स्पर्धांमध्येही भारत - पाकिस्तान सामन्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.