लपून बसलेल्या 107 जणांना पोलीस शोधतील अन् तिथेच ठोकतील; एकनाथ शिंदेंचा गर्भित इशारा
Marathi April 27, 2025 06:25 PM

बुलढाणा : महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 पाकिस्तान बेपत्ता झाल्याचे आढळून आले. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही, असे वृत्त माध्यमांत झळकले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे की, पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडावा. महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा, असे फर्मान सरकारने काढले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील इशारा दिलेला आहे. तर, मी सुद्धा भाषणात बोललो की, 107 लोकं जे कुठे लपले असतील त्यांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील, अशा शब्दात महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकेनाथ शिंडे (एकनाथ शिंदे) यांनी थेट इशाराच दिला आहे.

आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचा कारण नाही. जे आश्रय देतील त्यांना देखील सोडले जाणार नाही. म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ देश सोडून निघून जावं, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली. तसेच, काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता. त्या ठिकाणी जाणे हे माझं कर्तव्य होतं. मात्र, त्यातही विरोधक राजकारण करतात, असेही शिंदेंनी म्हटले.

मदतीला उबाठा गेले नाहीत – शिंदे

पहलगाम हल्ला हा देशावरील हल्ला आहे. देशाच्या आत्म्यावर हल्ला आहे. मात्र पंतप्रधान मोदीजी सक्षम आहेत. खून का बदला खून से ही आपली सर्वांची भावना आहे. आता ही आरपारची लढाई असेल. हा शेवटचा आतंकवादी हल्ला असेल. आता घुसके मारने वाला भारत आहे. सगळे भारतीय आज पंतप्रधानांच्या पाठीशी उभे आहेत. देशातील सर्व पक्ष अतिरेकी हल्ल्यानंतर मदतीला गेले. मात्र, उबाठा गेले नाहीत, हे यांचं देशप्रेम? असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.

एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही

मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतोय, यावर उलट्या-सुलट्या बातम्या करू नका. एकही पाकिस्तानी नागरिक हरवला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पाकिस्ताना नागरिकांबाबत माहिती दिली.

महाराष्ट्रातील 48 शहरात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. नागपूर शहरात सर्वाधिक 2 हजार 458 पाकिस्तानी आढळले असून ठाणे शहरात 1106 पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत 14 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त 51 पाकिस्तान्यांकडं वैध कागदपत्रं मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. 107 पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नाही, अशी माहिती समोर आली होती. त्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा

Video लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही; मंत्री नरहरी झिरवळ स्पष्टच बोलले

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.