Terror Attack Update : दिल्लीत हालचालींना वेग; दुपारी महत्वपूर्ण बैठक, आता राजनाथ सिंह यांची मोदींसोबत खलबतं...
Sarkarnama April 28, 2025 03:45 AM

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. सिंधू जलकरार रद्द करत पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. तर आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना ठेचून काढण्याचा इशारा दिला आहे. आता पुन्हा एकदा दिल्लीतील बैठकांचा वेग वाढला आहे.

ने यापूर्वी पाकिस्तानाल सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या माध्यमातून जोरदार झटका दिला होता. आता पुन्हा एकदा यापेक्षाही मोठा दणका देण्याची तयारी भारताने सुरू केल्याचे सध्याचे चित्र आहे. त्याचेच प्लॅनिंग दिल्लीत सुरू असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापार्श्वभूमीवर आज केंद्रीय संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी सीडीएस अनिस चौहान यांना बोलवून घेतले होते. त्यांच्यासोबत बराचवेळ बैठक सुरू होती.

बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानच्या निवासस्थानी गेले. या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान सीमेवर भारताने सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. सीमा भागातील नागरिकांनाही सतर्क करण्यात आले आहे. तिन्ही दलांकडून आक्रमक युध्दाभ्यास केला जात आहे. पाकिस्तानने त्याचा चांगलाच धसका घेतला आहे.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएच्या हाती आला आहे. यामध्ये पाकिस्तानाचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी केली जात असून घटनेचे व्हिडीओही तपासले जात आहेत. एनआयएच्या टीमकडून पुरावे गोळा केले जात आहेत. हे षडयंत्रामागे नेमका कुणाचा हात आहे, कुठे रचले गेले, यासाठी सर्वबाजूने तपास केला जात आहे.

एनआयएच्या टीमने महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये जाऊन प्रद्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. प्राथमिक तपासामध्ये पाच ते सात दहशतवादी असण्याची शक्यता आहे. या दहशतवाद्यांकडे कोणती शस्त्र होती, याचा तपासही लागला आहे. फॉरेन्सिकच्या अहवालानुसार, दहशतवाद्यांकडे एके 47 आणि एम 4 प्रकारच्या रायफली होत्या. त्यातून गोळ्या झाडत त्यांनी पर्यटकांची हत्या केली.     

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.