पुणे - बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात साडेसहा महिन्यांनी अटक करण्यात आलेला आरोपी बाप्या ऊर्फ सोमनाथ ऊर्फ सूरज दशरथ गोसावीच्या शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार असून, डीएनए चाचणीसाठी रक्त, नखे, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत.
बोपदेव घाटात मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना तीन ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपी बाप्या ऊर्फ सोमनाथ ऊर्फ सूरज दशरथ गोसावी (वय ३३, रा. दीपनगर, काटेवाडी, बारामती) याला पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी शनिवारी अकलूज परिसरातून ताब्यात घेतले.
गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख (वय २७, रा. आदर्श नगर, मंतरवाडी) आणि चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होलेवस्ती, उंड्री) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली होती.
गोसावीला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गोसावी व त्याच्या साथीदारांनी मानवी जिवाला काळिमा फासणारे घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार, लुटलेले दागिने, गुन्हा करताना घातलेले कपडे जप्त करायचे आहेत. आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे, तसेच त्याने साथीदारांसोबत हा गुन्हा कसा केला, याबाबत चौकशी करायची आहे.
त्यामुळे त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी केला. आरोपी फरार असताना कोणाकडे राहात होता, त्याला कोणी आश्रय दिला, याबाबतही चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी पुणे न्यायालयाने आरोपीला दोन मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.