दहशतवाद्यांनी घेतला जीव
वृत्तसंस्था/ कुपवाडा
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा काश्मीर खोऱ्यात मजबुतीने मोहीम राबवत आहेत. अशास्थितीत दहशतवादी आता सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. दहशतवाद्यांनी सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल माग्रे यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 45 वर्षीय रसूल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दहशतवाद्यांनी रसूल यांना का लक्ष्य केले हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, सध्या याप्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
गुलाम रसूल यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेत दहशतवाद्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. साल येथील रसूल हे स्वत:च्या घरी असताना दहशतवादी तेथे पोहोचले, दहशतवाद्यांनी प्रथम रसूल यांच्यासोबत संभाषण केले आणि अचानक त्यांच्यावर गोळीबरा करून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी तेथे धाव घेत पोलिसांना कळविले होते.