नागपूर : केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी डेडलाईन दिली आहे. त्यांना भारत देश सोडावाच लागेल. या देशात राहून पाकिस्तानचा जयजयकार करणे चालणार नाही.
जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा इकडे फटाके फोडतात, अशी ही वृत्ती मोडून काढली पाहिजे. पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात पाकिस्तानचे झेंडे फडकवणे हे आम्हाला मान्य नाही, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी `पाकिस्तान के लोक चले जाव'' ही भूमिका घेतली आहे. ती योग्य आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना शनिवारी व्यक्त केले.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. यावर बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांनी महाराष्ट्र आणि देशातील जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे. त्यांना साथ देणाऱ्या आणि मिठ्या मारणाऱ्या नेत्यांनी यापासून धडा घेतला पाहिजे.
सावरकरांनी विश्वाला प्रेरणा दिली. त्यांची निंदा करणे, त्यांना वाईट पद्धतीने बोलले जात असतानाही उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यांना पाठिंबाही दिला. आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारत होते, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी हाणला.
राज्य विकसित होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहावेमहाराष्ट्र विकसित करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र विकसित होत पर्यंत ते मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असे बावनकुळे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा आम्ही सगळे विकसित महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत. आमचे राज्यात सरकार पुढचे पंधरा वर्षे आले पाहिजे. म्हणून आम्ही काम करत असल्याचे बावनकुळे म्हणाले. फडणवीस गतिमान मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जावा अशी भावना आहे. जनतेला राज्यात फडणवीस मुख्यमंत्री पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.
३० पर्यंत जिल्हाध्यक्ष, १२८० मंडळ गठित होणार३० एप्रिलपर्यंत आमचे जिल्हाध्यक्ष, १२८० मंडळ गठित होणार आहे. राज्य सरकारचे १०८ महामंडळ, ७६५ अशासकीय सदस्य, वेगवेगळ्या महामंडळांवर जिल्हास्तरीय तालुकास्तरीय कमिटी यावर महायुतीतील तीन ते पाच हजार कार्यकर्ते मे व जून या दोन महिन्यांत विविध पदावर येतील. यासाठी महायुतीचे नेते आणि पदाधिकारी एकत्र बसून सर्व शासकीय समित्या, महामंडळ केंद्रीय भाजपच्या परवानगीने गठित करणार आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.