भुईंज : येथील अजिंक्य संजय पिसाळ याची स्पर्धा परीक्षेतून फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे भारतीय वायू सेनेच्या फ्लाइंग ऑफिसर या स्पर्धा परीक्षेतून निवड झालेला अजिंक्य पिसाळ हा सायकलपटू आहे. त्याने देशभरात सायकलवरून प्रवास केला आहे. देशसेवेची जिद्द मनात बाळगून तो वायुसेनेत जाऊन लढाऊ विमानाचे नेतृत्व करण्याचे त्याचे स्वप्न होते. ते आज सत्यात उतरले आहे.
अजिंक्य हा गरवारे नायलॉन कंपनीचे विभागीय व्यवस्थापक संजय पिसाळ व वाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षिका नीता पिसाळ यांचा सुपुत्र असून, पत्रकार जयवंत पिसाळ यांचा पुतण्या आहे. त्याच्या निवडीबद्दल भुईंज येथे ज्ञानेश्वरी पारायण मंडळ व प्रेस क्लबच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात येणार आहे.
मंत्री मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रमोद शिंदे, सुधीर पाटील, तसेच विजय वेळे, शुभम पवार, रामदास जाधव, राहुल तांबोळी, जयवंतराव पिसाळ, शैला पिसाळ, किशोर रोकडे, पांडुरंग खरे, विनोद भोसले, जितेंद्र वारागडे, हेमंत बाबर, संजय माटे, प्रकाश पावशे आदींनी त्याचे अभिनंदन केले.