कारंजा : शनि शिंगणापूर येथे दर्शनाला जात असताना भाविकांच्या कारला अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. समृद्धी महामार्गावर शनिवार २६ एप्रिल रोजी पहाटे साडे सहा वाजता ही घटना घडली.
दुर्घटनाग्रस्त कारमधून तीनजण शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होते व तिघेही नागपूर येथील रहिवासी आहेत. श्रीजीत राऊत (वय २५) असे मृत व्यक्तीचे नाव असून रोहित अजित पेठे (वय २३) आणि श्रवण सिद्धेश्वर पेठे (वय २३) अशी जखमींची नावे आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार श्रीजीत त्याच्या दोन मित्रांसह कारने नागपूरहून शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होता. समृद्धी मार्गावरील चॅनेल २०७ वर त्यांची कार समोरील ट्रकला धडकली. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील व श्रीगुरुमंदिराची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहचल्या. त्यातून जखमींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
तेथे श्रीजीतला मृत घोषित केले. तर उर्वरित दोघांवर उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. मागील काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर सातत्याने सुरू असलेली अपघाताची मालिका नुकतीच खंडित झाली होती परंतु आता या अपघाताच्या घटनेने त्यात आणखी भर घातली आहे.