माळशेज घाटाचे रुंदीकरण वादात
esakal April 28, 2025 01:45 AM

मुरबाड, ता.२७(बातमीदार)ः कल्याण मुरबाड माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ या रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामासाठी शेतकऱ्यांच्या जागा जबरदस्तीने काबीज करण्यात आली आहे. पण राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याची तक्रार ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष विठ्ठल घरत यांनी केली आहे.
माळशेज घाट मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ या महामार्गाच्या मुरबाड तालुक्यातील कदम पाडा ते सावरणे दरम्यान रस्त्याचे काम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. हा रस्ता शेतकऱ्यांच्या खासगी मालकीच्या जागेतून जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करून त्यांचा मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू करून नंतरच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असती तर शेतकऱ्यांनी विरोध केला नसता, असे घरत यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जागेचा मोबदला देण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली नसल्याने दोषी अधिकाऱ्यांकडून कामाच्या विलंबाची भरपाई वसूल करण्यात यावी, अशी मागणी घरत यांनी केली आहे.
--------------------------------------------------
अधिसूचनेचा प्रस्ताव पोर्टलवर
भूसंपादनासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ नुसार कलम ३ डी ची अधिसूचना उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्याकडून २२ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे यांचे कार्यालयात मिळाली आहे. अधिसूचनेचा प्रस्ताव भूमी राशी पोर्टलवर प्रसिद्धीसाठी सादर करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्याकडून शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यासाठी निवाडा जाहीर करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता ठाणे यांनी संघर्ष समितीचे नेते प्रकाश पवार यांना कळवले आहे.
-----------------------------------
विरोधाची मुख्य कारणे
कल्याण मुरबाड माळशेज घाट रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे कामाची निविदा काढण्यापूर्वी जमीन अधिग्रहणाच्या बाबी पूर्ण करणे गरजेचे होते. पण निविदा काढण्यात आल्या, वर्कऑर्डर देण्यात आली, जमिनीचा मोबदला, नुकसान भरपाई देता सुरू करण्यात आलेल्या या कामाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे रस्त्याचे काम मुदतीमध्ये पूर्ण होणे कठीण आहे. या विलंबाला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांची जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे जबाबदार आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.