अर्थसंकल्प २०२५ मधील बदलापूर्वी, प्राप्तिकर कायद्याच्या कलम १९४-आयबीनुसार, कोणत्याही विविक्षित व्यक्तीने किंवा हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीने (कलम १९४-आयमधील दुसऱ्या तरतुदीनुसार वगळलेले सोडून) रहिवाशांना आर्थिक वर्षात दोन लाख ४० हजार रुपयांपेक्षा अधिक घरभाडे दिल्यास उद्गम कर कपात (टीडीएस) करणे बंधनकारक होते.
त्यानंतर ही रक्कम प्रशासकीय अधिकारात सहा लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, हा बदल संसदेने मंजूर केलेला नव्हता, तो अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला. आता अर्थसंकल्पातील बदलानुसार भाडेकरूने वर्षातील एका महिन्यासाठी किंवा महिन्याच्या काही भागासाठी ५० हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे दिले असेल, तर घरभाड्याच्या रकमेतून दोन टक्के दराने त्या महिन्यात उद्गम करकपात करणे बंधनकारक आहे.
याचा अर्थ करकपातीचा निकष वर्षभरात द्यावयाचे घरभाडे होते, त्यात बदल होऊन आता ते महिन्याच्या किंवा त्यातील काही भागाच्या कालावधीसाठी असणार आहे. हा फार मोठा बदल सर्व नागरिकांनी विचारात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी भाडेकरू करदाता असलाच पाहिजेच असे नाही, तर सर्वसामान्य भाडेकरू व्यक्तीसही हा नियम लागू होणार आहे.
करकपातीची पद्धत
भाडेकरू घरमालकाला वार्षिक तत्वावर घरभाडे देत असल्यास हा उद्गम कर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा भाडे करारनामा वर्षाच्या आतमध्ये संपला, तर करारनाम्याच्या शेवटच्या महिन्यात करकपात करावी लागते. भाडेकरार दोन आर्थिक वर्षांत विभागला गेला असेल, तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आणि दुसऱ्या आर्थिक वर्षात ज्या महिन्यात करार संपेल, त्या महिन्यात करावी लागते.
घरमालकाचा पॅन नसेल, तर घरभाड्यावर २० टक्के दराने करकपात करावी लागेल. ‘पॅन’ नसल्यामुळे भाडेकरूला २० टक्के उद्गम करकपात करावी लागेल आणि ती रक्कम शेवटच्या महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्त असेल, तर भाड्याएवढी रक्कम उद्गम कर म्हणून कापली तरी चालू शकते.
संयुक्त नावाने असल्यास...
जे घर किंवा इमारत भाड्याने घेतली आहे आणि त्याची मालकी एकापेक्षा जास्त मालकांकडे असेल तर नव्या नियमानुसार प्रत्येक मालकाच्या मालकी हक्काच्या हिश्शानुसार करकपात आवश्यक आहे. उदा. एका घराचे दरमहा भाडे एक लाख रुपये आहे आणि त्याची मालकी रिद्धी व सिद्धी या दोघांकडे आहे.
‘रिद्धी’चा हिस्सा ८० टक्के आणि ‘सिद्धी’चा २० टक्के असल्यास, घरभाडे दोघींना त्याचप्रमाणात विभागून म्हणजे ‘रिद्धी’ ला ८० हजार रुपये आणि ‘सिद्धी’ला २० हजार रुपये दिले जाईल. ‘रिद्धी’ला दिलेले दरमहा भाडे ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याने त्यावर दोन टक्के उद्गम कर कापावा लागेल, तर ‘सिद्धी’ला दिलेले भाडे दरमहा ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे त्यावर कर कापावा लागणार नाही.
उद्गम कर कधी भरावा?
ज्या महिन्यात उद्गम कर कापला आहे, तो महिना संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत हा कर फॉर्म २६ क्यूसीमध्ये चलन भरून सरकारकडे जमा करावा लागतो. आपण निवासी भारतीयाला घरभाडे दिल्यास टॅक्स डिडक्शन क्रमांक (टॅन) घेणे गरजेचे नाही. भाडेकरूचा आणि मालकाचा ‘पॅन’ भरून २६ क्यूसी या फॉर्मसोबत पैसे भरावे लागतात.
हा कर भरल्यानंतर करदात्याला प्राप्तिकर खात्याच्या ‘ट्रेसेस’च्या संकेतस्थळावर नोंदणी करून १५ दिवसांच्या आत उद्गम कर कापल्याचे प्रमाणपत्र (टीडीएस सर्टिफिकेट) फॉर्म १६ सी डाऊनलोड करून मालकाला द्यावे लागते. फॉर्म २६ क्यूसी भरण्यास विलंब झाल्यास प्रतीदिन २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागते. हे विलंब शुल्क करापेक्षा जास्त नसते.