Accident News : व्हॅन विहिरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू, वाचवायला गेलेल्यानेही विषारी वायूमुळे गमावला जीव
esakal April 28, 2025 08:45 AM

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये भीषण दुर्घटना घडली असून यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव व्हॅन दुचाकीला धडकल्यानंतर विहिरीत कोसळली. यात दुचाकीस्वारासह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. स्थानिकांनी सांगितलं की, भरधाव वेगात असलेली व्हॅन अनियंत्रित होऊन हा अपघात झाला.

मंदसौर इथल्या नारायणगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुढा टकरावत फाट्याजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली. व्हॅनमध्ये एकूण १३ प्रवासी होती. व्हॅनने आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर व्हॅन विहिरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की बचावकार्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.

अपघातानंतर मनोहर सिंह नावाची व्यक्ती लोकांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरली होती. मात्र विषारी वायूमुळे त्याचाही मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उपमुख्यमंत्री जगदीश देवडा, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दाखल झाले.

जिल्हा रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर बचावकार्यासाठी देण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहन विहिरीतून बाहेर काढले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात आलंय. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.