अॅव्हॅंटेल (शुक्रवारचा बंद भाव - रु. १३१)
esakal April 28, 2025 08:45 AM

- भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक

अॅव्हॅंटेल ही १९९० मध्ये स्थापित झालेली आणि २००० मध्ये शेअर बाजारात नोंदणीकृत झालेली संरक्षण क्षेत्रातील कंपनी आहे. अॅव्हॅंटेल कंपनी प्रामुख्याने बिनतारी आणि उपग्रहामार्फत होणाऱ्या संदेशवहन उपकरणांचे, रडार प्रणालींचे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन करते.

संरक्षण क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स, एल अँड टी या कंपन्यांना; तसेच इस्रो, ‘डीआरडीओ’सारख्या संस्थांना, जहाजबांधणी कंपन्यांना ही कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे पुरवते. रेल्वेलाही ही कंपनी माल पुरवते आणि एकूण महसुलाच्या जवळजवळ नऊ टक्के निर्यातही करते, ज्यात लॉकहीड मार्टिनसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. यासाठी आवश्यक असणारी संशोधन आणि विकासक्षमता कंपनीकडे आहे. ‘आयमेड्स ग्लोबल’ या उपकंपनीद्वारे ही कंपनी मेडिकल उपकरणेही बनवते.

कंपनीकडे सध्या जवळजवळ १३० कोटी रुपयांच्या ऑर्डर आहेत आणि नव्या ऑर्डर सतत मिळत आहेत. कंपनीची विक्री २०२५ मध्ये जवळजवळ २५० कोटी रुपयांपर्यंत आणि निव्वळ नफा ६५ कोटी रुपयांपर्यंत होईल, असे दिसते. संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, रेल्वे आणि जहाजबांधणी या क्षेत्रांमध्ये येत्या पाच वर्षांमध्ये खूप वाढ दिसेल आणि ऑर्डरचा ओघ वाढता असेल अशी अपेक्षा आहे.

आर्थिक आकडेवारी

कंपनीचे बाजारमूल्य जवळजवळ ३२०० कोटी रुपये असून, कंपनीची विक्री आणि निव्वळ नफा गेल्या तीन वर्षांमध्ये ४२ टक्के आणि ५४ टक्के चक्रवाढदराने वाढले आहेत. हे आकडे प्रचंड वेगाने होणारी वाढ दर्शवतात. कंपनीचे कर्ज नगण्य आहे. या वर्षीचा आरओसीई ४८ टक्के म्हणजे उत्तम आहे.

कंपनीचा ताळेबंद २७७ कोटी रुपयांचा असून, त्यात मालसाठा आणि येणे असलेली रक्कम मिळून जवळजवळ दीडशे कोटींची रक्कम दिसते. कंपनी मुख्यतः सरकारी संस्थांना माल पुरवत असल्याने येणे असलेली रक्कम जास्त असणे थोडे स्वाभाविक आहे; पण मालसाठा आणि येणे रक्कम सतत वाढत आहे, ही एक चिंतेची बाब आहे.

यामुळे खेळत्या भांडवलाची गरजही जास्त आहे आणि कंपनीची पाच वर्षांची सरासरी रोकड आवक कार्यचालन नफ्याच्या तुलनेत फक्त ४४ टक्के आहे, जी किमान ६० टक्के तरी असायला हवी. कंपनीचे मार्जिन वाढत असून, ते उत्तम आहे.

मूल्यांकन

कंपनीचा शेअर सध्या ४८.९ या पीई गुणोत्तराला उपलब्ध आहे, जे २४.६ या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा बरेच जास्त आहे. मात्र, याआधी गेल्या वर्षी बाजाराने या कंपनीला ९० च्यावर ‘पीई’ इतके मूल्यांकनही दिले होते. पीईजी १.१६ आहे, त्यामुळे निव्वळ नफावाढीच्या दृष्टीने मूल्यांकन वाजवी आहे. मात्र, नफावाढीचा दर कायम राहणे किंवा वाढणे आवश्यक आहे. किंमत/विक्री आणि किंमत/कार्यचालन रोकड आवक ही गुणोत्तरेही १३ आणि ४७ म्हणजे जास्त आहेत.

निष्कर्ष

कंपनीची रोकड आवक कमी असणे ही एक धोक्याची घंटा आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी कंपनी निव्वळ नफा वाढवून तर दाखवत नाही ना, याची छाननी करणे आवश्यक आहे. यासाठी कंपनीच्या व्यवहारांचे फॉरेन्सिक विश्लेषण करून काही गडबड-घोटाळे तर नाहीत आणि सरकारी ग्राहकांकडून बिले लवकर मिळत नसणे हेच कमी रोकड आवक असण्याचे एकमेव कारण आहे, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. ही एक प्राधान्य क्षेत्रातील वेगाने वाढणारी कंपनी आहे आणि गुंतवणुकीसाठी अभ्यासनीय आहे.

(डिस्क्लेमर : हा लेख केवळ शैक्षणिक उद्दिष्टांसाठी असून, गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी त्यांच्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अपेक्षित आहे.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.