Latest Marathi News Updates : जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत तीन जागा जिंकत डाव्यांचे वर्चस्व; एका जागेवर फडकला भगवा
esakal April 28, 2025 03:45 PM
JNU Election Result : जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचे वर्चस्व; एका जागेवर फडकला भगवा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका रात्री उशिरा संपल्या. या निकालांत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फ्रंट (AISA-DSF) यांच्या डाव्या आघाडीने ४ पैकी ३ केंद्रीय पॅनल जिंकले. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) एक जागा जिंकली आहे.

Palghar Earthquake : पालघरच्या डहाणू तलासरी भागात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची घटना घडली. डहाणू तलासरी भागात संध्याकाळी 7 वाजून 23 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरले आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Bhandara Accident : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

मुंबई-कोलकाता महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडलीये. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी आहे. हा भीषण अपघात मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील बेला इथं 27 एप्रिलच्या रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडला आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावर चिथावणीखोर वक्तव्य; युट्यूबर नेहा सिंग राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

लखनौ : पहलगाम हल्ल्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल चर्चेत आलेल्या युट्यूबर नेहा सिंग राठोडविरुद्ध रविवारी हजरतगंज पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Kolhapur Water Shortage : निम्म्या कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेच्या पाणी उपसा पंपांसाठी असलेल्या व्हीडीएफ यंत्रणेत बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. त्यातच महापालिकेकडे असणारे मोजके टॅंकरची काही माजी नगरसेवकांकडून पळवापळवी सुरू असल्याने अनेक भागांतील नागरिक पाण्यापासून वंचित राहिले.

Nipani Bandh : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निपाणीत कडकडीत बंद

निपाणी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. २७) येथील विविध व्यापारी असोसिएशनसह संघटनांनी शहर बंदची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात आज कडकडीत बंद पाळून व्यापारी, व्यावसायिकांसह नागरिकांनी दहशतवाद्यांचा निषेध केला. बंदमुळे दिवसभर शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्ग ओस पडल्याने संपूर्ण शहर शोकमग्न झाल्याचे दिसून आले.

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आजऱ्यात आज लोकार्पण

आजरा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. २८) होत आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. यानिमित्त आजरा शहरात विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू; दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र

Latest Marathi Live Updates 28 April 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या कारवायांना नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर सक्रिय झाले असून, दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र चालूच आहे, तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीमही सुरू असून, त्यांच्या घरांना जमीनदोस्त करण्याची कारवाईही स्थानिक प्रशासनाने हाती घेतली आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत दरवर्षी येणाऱ्या पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात रविवारी पहाटेच्या सुमारास लागलेली भीषण आग दहा तासांनंतर आटोक्यात आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आजऱ्यात आज होत आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होईल. तर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.