श्रीनगर - ‘दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे. मात्र, या कारवाईमध्ये निरपराध काश्मिरी नागरिक भरडला जाऊ नये आणि नागरिकांना बळीचा बकरा बनवले जाऊ नये,’ अशी अपेक्षा जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.
पहेलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांकडून जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, उमर अब्दुल्ला यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये वरील अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘दहशतवाद्यांविरोधात मुळापासून उघडून टाकण्याची कारवाई केली पाहिजे. जम्मू-काश्मीरच्या जनतेनेही खुलेपणाने आणि उत्स्फूर्तपणे या हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यातील दोषींना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, मात्र यात सामान्य नागरिकाचे नुकसान होऊ देऊ नये.’
केंद्र सरकारने दहशतवादी आणि सामान्य नागरिक यांच्यामध्ये काळजीपूर्वक फरक करावा, अशी प्रतिक्रिया ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी दिली. त्या म्हणाल्या, ‘‘काश्मीर खोऱ्यातून हजारो जणांना अटक केल्याच्या बातम्या येत आहे.
दहशतवाद्यांबरोबरच काही सामान्य नागरिकांची घरेही पाडण्यात आली आहेत. सामान्य नागरिक, विशेषतः जे दहशतवादाला विरोध करत आहे त्यांना लक्ष्य करण्यात येऊ नये. त्यातून समाजात दुही व दहशत निर्माण करण्याच्या दहशतवाद्यांच्या उद्दिष्टांना खतपाणीच मिळेल.’
काश्मीर व काश्मिरी नागरिक सामूहिक शिक्षेला सामोरे जात आहेत, असा आरोप खासदार रहुल्ला मेहदी यांनी केला. समाजातील कोणत्याही एखाद्या घटकांना सामूहिक शिक्षा देण्यात येऊ नये, असे आवाहन अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार शेख खुर्शिद यांनी केले.
पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोऱ्यातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध केला. सकारात्मक बदलाचे एक प्रतीक म्हणून या घटनेकडे पाहायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, प्रत्येक लोकनियुक्त प्रतिनिधी आणि कायदे पाळणाऱ्या नागरिकांनी न्यायाचे समर्थ करायला हवे असेही त्यांनी नमूद केले.