Kolhapur : ...मग शेतकऱ्यांचा प्रोटोकॉल कोणाकडे?; पाटबंधारेचे दक्षिण कार्यालय गडहिंग्लजला आणण्याचा प्रश्न..
esakal April 27, 2025 03:45 PM

अजित माद्याळे

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांतील मध्यम व लघु प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या दक्षिण कार्यालयांतर्गत येतात. या विभागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कोल्हापुरात कार्यरत असणारे दक्षिण विभागाचे कार्यालय गडहिंग्लजला आणण्याची धडपड सुरू असली तरी अधिकाऱ्यांची तयारी नसल्याने हे कार्यालय कोल्हापुरातच सुरू आहे.

मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका, त्यासाठीचा प्रोटोकॉल सांभाळण्यासाठी हे कार्यालय कोल्हापुरातच हवे, असे समर्थन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा प्रोटोकॉल कोण पाळणार, या प्रश्नाचेही उत्तर देण्याची गरज लाभार्थी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

या विभागात चित्री, आंबेओहोळ, चिकोत्रा, जंगमहट्टी, सर्फनाला प्रकल्पासह लघु जलसाठेही पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येतात. जिल्ह्याचे दक्षिण व उत्तर अशा दोन सिंचन विभागाचे कार्यालय कोल्हापुरातच कार्यरत आहे. हा भाग दक्षिण विभागात मोडतो.

म्हणजेच या प्रकल्पातील पाणी वापर परवाने, ना हरकत दाखले, लाभक्षेत्र परवाना या शेतकऱ्यांशी निगडित आणि बंधारे दुरुस्ती, रोटेशन मंजूर करून घेणे, अंदाजपत्रकाला मंजुरीचे अधिकार दक्षिण विभागाकडील अधिकाऱ्यांकडे असतात. उपविभागीय कार्यालये ही केवळ मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत. स्थानिक कार्यालयांना कोणतेच अधिकार नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.

मुळात चंदगडचे कोल्हापूरपर्यंतचे अंतर शंभर किमी आहे. पाडगावचाच विचार केला तर तेथून कोल्हापूर ९०, तर गडहिंग्लज ७५ किलोमीटरवर आहे. साध्या बैठकीसाठी जायचे म्हटले तरी स्थानिक कर्मचाऱ्यांचा दिवस मोडतो. शेतकऱ्यांना लागणारे विविध दाखले, पाणी परवान्यात येणाऱ्या त्रुटींसंदर्भात विचारपूस करायचे म्हटले तरी स्थानिक अधिकारी वरिष्ठांकडे बोट दाखवतात.

मग बेळगावच्या टोकावरील चंदगडचा शेतकरी शंभर ते सव्वाशे कि. मी. प्रवास करून कोल्हापूरला जायचा हे कोणत्या माणुसकीत बसते, याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा. मुळात दक्षिण विभागांतर्गत येणारे सिंचनाचे क्षेत्र कोल्हापूर कार्यालयापासून ८० कि. मी. अंतराच्या बाहेर आहे.

म्हणजे कोल्हापुरातील अधिकाऱ्यांचा ८० किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर मग सिंचन क्षेत्र अगर प्रकल्पाला भेट देण्यासाठी जावे लागते. त्यामुळे हे कार्यालयच गडहिंग्लजमध्ये स्थलांतरित झाल्यास शेतकरी व प्रशासकीय दृष्ट्याही सोयीचे ठरणार आहे; परंतु काही करून कोल्हापूर सोडायचे नाही या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे कार्यालय येथे येण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.

शेतकऱ्यांची किंमत शून्य

संबंधित कार्यालय गडहिंग्लजला आणण्याच्या निवेदनावर ‘दक्षिण’च्या अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची दक्षिण कार्यालयात सोडवणूक होत असते. त्यात शेतकऱ्यांची अडचण होत नसल्याचे स्पष्ट करून मुख्यालयात मंत्र्यांच्या बैठका, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी, समन्वय बैठकांना हजर राहण्यासाठी कोल्हापूरमध्येच कार्यालय असणे गरजेचे असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे. दरम्यान, केवळ प्रोटोकॉल व बैठकांसाठी कोल्हापूर ठिकाण योग्य म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी व त्यांच्यावरील आर्थिक भुर्दंडाबाबत कोणतेच गांभीर्य अगर माणुसकी नाही का, अशी विचारणा शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.