MI vs LSG Live: मुंबई इंडियन्सचा विजयी 'पंच'! लखनौ सुपर जायंट्सला हरवले, पण हादरे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बसले
esakal April 28, 2025 02:45 AM

Mumbai Indians vs Lucknow Super Giants Marathi Update: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये वानखेडे स्टेडियमवर रविवारी लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. मुंबईने IPL2025 मधील सलग पाचव्या विजयाची नोंद केली आणि Point Table मध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. मुंबईचा १० सामन्यांतील हा सहावा विजय ठरला आणि त्यांनी १२ गुण व चांगल्या नेट रन रेटमुळे ह RCB ला मागे टाकले. जसप्रीत बुमराहने भेदक मारा करून मोठ्या घातली आणि विजयात सिंहाचा वाटाही उचलला.

घरच्या मैदानावर एकदम 'दादा' सारखा खेळला. रोहित शर्माला तिसऱ्या षटकात स्ट्राईक मिळाली आणि त्याने पहिल्या दोन चेंडूवर षटकार खेचून जणू रागच व्यक्त केला. पण, यंदाच्या पर्वात पहिलाच सामना खेळणाऱ्या मयांक यादवने चतुराईने चौथा चेंडू ऑफ साईडला टाकून रोहितला ( १२) झेल देण्यास भाग पाडले. रायन रिकेल्टन ३२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ५८ धावांची वादळी खेळी केली. दिग्वेश राठीने त्याला बाद करून नोटबूक सेलिब्रेशन दाखवले.

विल यंग ( २९) चांगला खेळत होता, परंतु प्रिन्स यादवने त्याचा आऊट स्वींग चेंडूवर त्रिफळाचीत केले. तिलक वर्मा ( ६) व हार्दिक पांड्या ( ५) एकेरी धावसंख्येवर बाद झाल्याने MI चा वेग थोडा मंदावला होता. पण, सूर्यादादाने कमाल केली. त्याने २८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५४ धावा कुटल्या. नमन धीर ११ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला आणि पदार्पणवीर कॉर्बिन बॉशने १० चेंडूंत २० धावा चोपून संघाला ७ बाद २१५ धावांपर्यंत पोहोचवले.

जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात एडन मार्करमला ( ९) बाद केले. रिषभ पंत ( ४) आजही अपयशी ठरला. विल जॅक्सने त्याचा काटा काढला. फॉर्मात असलेल्या निकोलस पूरनलाही ( २७) जॅक्सने झेलबाद केले. सूर्यकुमार यादवने अफलातून झेल घेतला. आयुष बदोनी व मिचेल मार्श यांची जोडी चांगली सेट झाली होती आणि दोघांनी २८ चेंडूंत ४६ धावा जोडल्या होत्या. ट्रेंट बोल्टने मुंबईला यश मिळवून देताना मार्शला ( ३४ धावा, २४ चेंडूं) बाद केले. मार्शने ३ चौकार व २ षटकार खेचले होते.

१४व्या षटकात बॉशच्या चेंडूवर बदोनी स्वीप मारायला गेला अन् तो चुकला. अम्पायरने वाईड द्यावे अशी त्याची मागणी होती, परंतु ते नाझी झाले. रिप्लेमध्ये चेंडू व बॅटचा संपर्क झाल्याचे दिसल्यावर बॉशने डोक्यावर हात मारला, कारण मुंबईच्या यष्टिरक्षकाने अपीलच केले नव्हते. त्यामुळे बदोनीला तेव्हा जीवदान मिळाले, परंतु पुढच्याच षटकात बदोनी ( ३५) झेलबाद होऊन माघारी परतला. जसप्रीतने पुढच्या षटकात डेव्हिड मिलरला ( २४) बाद करून लखनौचा पराभव पक्का केला.

जसप्रीतने त्यानंतरच्या षटकात आणखी दोन विकेट्स घेतल्या व ४-०-२२-४ अशी स्पेल पूर्ण केली. त्यानंतर बॉशने धक्का दिला आणि लखनौला २० षटकांत १० बाद १६१ धावा करता आल्या. मुंबईने ५४ धावांनी सामना जिंकला. मुंबईचा हा आयपीएलमधील १५० वा विजय ठरला आणि आयपीएलमध्ये एवढे सामने जिंकणारा हा पहिलाच संघ ठरला.

या विजयानंतर मुंबई इंडियन्सने थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स हे प्रत्येकी १२ गुण असलेले संघ खाली घसरले आहेत. मुंबईचा नेट रन रेट हा ०.८८९ इतका आहे, जो DC व RCB पेक्षा जास्त आहे. गुजरात टायटन्स १२ गुण व १.१०४ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.